कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पंढरपूर :विठ्ठल भक्तांसाठी मंदिर समितीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. यासाठी मंदिर समितीकडून हॉटेल ताब्यात घेण्यात आले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.
विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या 364 रुममध्ये जवळपास रोज 1500 भाविकांच्या निवासाची सोय होऊ शकते. यामध्ये भाविकांना चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी होत्या. म्हणून मंदिर समितीने हे हॉटेल ताब्यात घेतले आहे. मंदिर समितीने चहा, कॉफी, दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली आहे. तर जेवणाची थाळी केवळ १०० रुपयात मिळणार असल्यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे ,वर्षभरात या भक्तनिवासामध्ये तीन लाखाहून जास्त भाविक येत असतात .

