कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यघटना ही सर्वोच्च स्थानी असून कुणीही संविधान बदलू शकणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
माणगाव (जि. रायगड) येथे राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
विवेक विचार मंचातर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले होते
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे काम पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांचे विचार अंगिकारून ते पुढे घेऊन जाताना समता, बंधुता, न्याय या तत्वाद्वारे मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्वांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगाराची उपलब्धता आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी गतीने प्रयत्न केले जात असल्याचे आवर्जून नमूद केले. राज्यातील कोणताही युवक बेरोजगार राहणार नाही यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, कौशल्य विकास योजना तसेच स्टार्टअप सारख्या योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामजिक न्याय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. नितीन मोरे (मुंबई), ज्योती साठे, सत्यवान महाडिक (महाड), घनश्याम वाघमारे (पुणे), संतोष पवार (छत्रपती संभाजी नगर) महावीर धक्का (जालना), मनीष मेश्राम (नागपूर), फकिरा खडसे (वर्धा) तसेच देव देश प्रतिष्ठान मुंबई, भीम प्रतिष्ठान सोलापूर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, बार्टीचे महासंचालक डॉ.सुनील वारे, विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत, कार्यवाहक महेश पोहनेरकर, सामाजिक कार्यकर्ते अश्विनी चव्हाण, किशोर कांबळे यांच्यासह राज्यातील १६० संघटनांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




