कोल्हापूर न्यूज / वि. रा. भोसले
दौलतवाडी हे मुरगूड कापशी रस्त्यावरचं एक छोटं गाव.या गावा भोवतालचे निसर्ग सौंदर्य तर इतकं अप्रतिम की जणू सृष्टीच या गावावर भुलली असावी.
हिरवळीच्या उंच माथ्यावर मंदिर आणि पायाशी विस्तीर्ण जलाशय.शेजारीच शिव गड नावाचे अध्यात्मिक केंद्र.इथे तर दूरवरून साधक येतात. दौलतवाडी गावानं ही दौलत लुटून एक पर्यटन स्थळ इथे उभा केले असते.
पण कसचं काय.
या गावाजवळून वाहणारा एक सुंदर झुळझुळता ओढा शेजारच्या सर पिराजी तलावाला जाऊन मिळतो.गावानं या ओढ्याला अक्षरशः कचरा कुंड करून ठेवले आहे.गावचा सगळा कचरा या ओढ्यात.अगदी शौचकुपाचे सांडपाणी सुध्दा.फुलं वेगळीच असायची.एवढ्यावर भागून कसे चालेल.रद्दी आणि कुजलेले सर्व कांहीं ओढ्याला अर्पण.शाळेच्या पिशव्या,चादरी , वाकळा आणि मोडकं तोडकं सगळं या ओढ्याला अर्पण.पुढे तलाव आहेच सगळं स्वाहा करून घ्यायला.तो तलाव मुरगूड करांना आणि यमगे कर शिंदेवाडीकर इत्यादी गावांना पाणी पाजतो.
नमामि गंगा म्हणत कांहीं वेडे समाज सेवक या ओढ्यात उतरले.
त्यांना वेडे म्हणायचं एवढ्यासाठी की समाज स्वच्छ करण्याचं त्यांना जणू वेडच लागलंय म्हणावे लागेल.
समाज सेवेची आणि स्वच्छ तेची सुध्दा एक नशा असते.राष्ट्र भक्तीची सुध्दा नशाच असते
गुटखा ,बियर व गांज्याची नशा बाळगणाऱ्या धुंद युवकांच्या गालावर लगावलेली ही थप्पड होय.
असे अनेक युवक मुरगूड मध्ये आहेत.
शिवतीर्थावर एकत्र जमतात आणि जिथं घा णीचं साम्राज्य असेल तिथे जायचे ठरवतात.ना कसला मोबदला ना कसल्या सन्मानाची अपेक्षा.
या युवकांनी दौलत वाडीचा हा ओढा स्वच्छ केला.सगळा कचरा काढून टाकला आणि वस्ती वाल्यांना नम्र आवाहन केले की आता पुन्हा या ओढ्यात कचरा टाकू नका व घाण येऊ देऊ नका.
या ओढ्यावर अलीकडे एक पूल झाले आहे.ग्राम पंचायतीने ओढ्याला लागून संरक्षक भिंत बांधली आहे. नागरीकांना ही स्वच्छ ते विषयी दक्ष राहण्यास सांगितले आहे.
पाच सहा वर्षानंतर दौलत वाडीच्या ओढ्याला स्वच्छतेची दौलत लाभली आहे.
या स्वच्छता मोहिमेत अनेक युवक सहभागी झाले.काम सुरू आहे पुढे सुरू राहील.सर पिराजी तलावाचे सुध्दा भाग्य उजळुदे हीच अपेक्षा.
स्वयंसेवक यांचा सहभाग याप्रमाणे...
शिवभक्त सर्जेराव भाट, तानाजी भराडे ,ओंकार पोतदार,जगदीश गुरव, सोमनाथ यरनाळकर इत्यादी इत्यादीसह कांहीं दौलतवाडी येथील नागरिक.



