कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड जवळच्या रस्त्यावर कर्नाटकातील तीन ट्रक पुराच्या पाण्यात अडकले होते. ड्रायव्हर व किन्नर मिळून ते सहाजण होते.दोन दिवस अन्न नाही पाणी नाही.
ट्रक खालून पुराचे पाणी वेगाने वहात होते.जणू त्या ट्रकवाल्याना वाकुल्या दाखवत होते.निसर्गाशी दांडगाई केलात आता भोगा त्याची फळे.ईश्वराची प्रार्थना करा.कोणीतरी येईल त्याच्या रूपाने तुम्हाला सोडवायला.
अगदी तसंच घडलं.
मुरगूड मधील समाजसेवी कार्यकर्ते मदतीला धावून आले.त्यात शिवभक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते.पाण्यात उतरून कांहींनी ब्रेक प्लेट्स साफ केल्या, चाकात अडकलेला चिखल साफ केला. हर हर महादेव ची गर्जना करून ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ट्रक जागचे हलेनात.शेवटी एक जेसीबी बोलावला.त्याने फक्त डिझेलचे पैसे घेतले.
तिन्ही ट्रक ओढून बाहेर काढले.ट्रक वाल्यांना स्वयंसेवकांनी आधी चहा नाष्टा दिला.नंतर त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.
ते सहाहीजण हात जोडत होते. त्यांची जात,धर्म पंथ काही कोणाला माहीत नव्हता.मोडक्या तोडक्या हिंदीत ते बोलत होते.कर्नाटकी टोन मध्ये देवाचे आभार मानत होते.
कार्यकर्त्यांनी त्यांना कांहीं पैसे हवेत का म्हणून विचारले.त्यांनी नम्रपणे ते नाकारले.स्वयंसेवकांनी माणुसकीच्या भावनेतून त्यांना मदत केली होती.नकतीच आषाढी वारी येऊन गेली होती.वारीत वारकरी एकमेकांना माऊली म्हणायचे.आपुलकीने विचारपूस करायचे .'माऊली 'मध्येच ते पांडुरंगाला शोधायचे. ट्रक वाल्यांना सुध्दा पुराच्या पाण्यात असाच पांडुरंग पावला होता.माऊली समजून त्या अनोळखी ट्रक वाल्यांना स्वयंसेवकांनी मदत केली होती.
जवळपास कोठे मंदिर नव्हते,मशीद नव्हती,चर्च नव्हते.
माणुसकी नावाचा धर्म होता.हृदयाचा देव्हारा होता.
मदत कार्यात सहभागी झालेल्या शिवभक्त स्वयंसेवकांची नावे याप्रमाणे.
सर्जेराव भाट,तानाजी भराडे,ओंकार पोतदार, बबन बारदेस,कर अनुप गाडगीळ.जगदीश गुरव,संकेत शहा,शिवाजी चौगुले,शिवप्रसाद बोरगावे,सुभाष अना वकर इत्यादी.
.


