कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विशाळगडाच्या परिसरात रविवारी जिल्हा प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाई आणि त्यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मंगळवारी विशाळगडाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शाहू महाराज दिसताच महिलांनी टाहो फोडला.
यापूर्वी पोलिसांनी शाहू महाराजांना विशाळगडाच्या वादग्रस्त परिसरात जाण्यापासून मज्जाव केला. शाहू महाराजांनी आपल्याला पोलिसांनी अडवल्याचे सांगितले. यानंतर शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरातील तोडफोड झालेल्या मशिदीची पाहणी केली. यावेळी स्थानिकांनी आपल्या व्यथा शाहू महाराजांसमोर मांडल्या.
शाहू महाराज आज विशाळगडावर गेल्यानंतर ज्या मशिदीत तोडफोड झाली तिथे जाऊन देखील पाहणी केली. यानंतर शाहू महाराज यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. शाहू महाराजांना पाहताच मुस्लिम महिलांनी टाहो फोडत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. रविवारी विशाळगडाच्या परिसरात काय घडलं? कशाप्रकारे तोडफोड करण्यात आली? कोणाचं नाव घेऊन तोडफोड केली जात होती, याची माहिती स्थानिकांनी शाहू महाराजांना दिली. आम्ही आमचा जीव कसा वाचवला, याची आपबीती महाराजांसमोर महिलांनी मांडली.

