कै कु सुशीला मगदूम ग्राम वाचनालय, अर्जुनी यांचे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

Kolhapur news
By -

 

             







                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मनं समृद्ध करायची असतील तर शिक्षण आणि समाज समृद्ध करायचा असेल तर शिक्षकाशिवाय  पर्याय नाही. सत्कार खूप करतात पण निरपेक्ष वृत्तीने केलेला सत्कारच महत्त्वाचा असतो, तो आयुष्याला उभारी देण्याचे काम करतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा .डॉ .अच्युत माने यांनी केले. 

     

 कै कु सुशीला मगदूम ग्राम वाचनालय, अर्जुनी यांचे वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते  प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बापूसाे यादव होते. 


   ते पुढे म्हणाले , मोबाईलमुळे लहान मुलांची आणि तरुणांची मनं विकारमय होत आहेत. भाैतिक समृद्धीच्या मागे लागल्याने मानसिक समृद्धी कमी होत आहे आणि मानसिक समृद्धी कमी झाल्याने सामाजिक समृद्धी लोप पावत आहे .भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्यामुळे माणसांचा एकमेकांशी संवाद कमी झालेला आहे. 

 

    यावेळी एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी कुमारी अनुष्का उमेश सुतार ,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 14 वा क्रमांक मिळवलेली कुमारी श्रावणी नितीन आडाव, जिल्ह्यामध्ये अकरावा क्रमांक मिळवलेला संग्राम विजय लोंढे, जिल्हा यादीत तेरावा क्रमांक मिळवलेली कुमारी समीक्षा उत्तम सावंत,शिष्यवृत्ती मार्गदर्शिका सौ एस एस मुजावर, पीएचडी पदवी प्राप्त केलेले तसेच साऊथ कोरिया येथे शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेले डॉ. रुपेश शिवाजी पेडणेकर यांचा त्यांच्या पालकांसह सन्मानचिन्ह, शाल, रोप आणि पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

       

 अनुष्का सुतार, श्रावणी आडाव, संग्राम लोंढे ,सौ एस एस मुजावर,डॉ. रुपेश पेडणेकर यांनी आपल्या मनोगतातून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संचालक श्री के एम पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.


  प्रारंभी पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकातून वाचनालयाच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीचा  आढावा वाचनालयाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी घेतला. सूत्रसंचालन सचिव राहुल देसाई यांनी तर आभार ग्रंथपाल जोतीराम मिसाळ यांनी मानले.


     उपसरपंच सुदाम देसाई,माजी सरपंच  युवराज देसाई,तुकाराम देसाई, समीर मुजावर,राजाराम पेडणेकर ,दिनकर आडाव,महादेव कांबळे ,बाबुराव मिसाळ, संचालक सज्जन कांबळे, जयसिंग देसाई,संतोष मिसाळ तसेच आप्पासो जाधव, शशिकांत देसाई, आनंदा आडाव, नारायण देसाई ,नारायण मिसाळ,दत्तात्रय पेडणेकर आदी प्रमुख उपस्थित होते.