राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीपची संधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Kolhapur news
By -

 

        


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   

मुंबई :राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीप प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. लाडका भाऊ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र बहिणींना संधी मिळणार आहे, म्हणून उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथी गृहामध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 


    राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय ते पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यासह महानगरपालिका, नगरपालिका विविध शासकीय कार्यालयांत उमेदवारांना त्यांच्या पात्रतेसह प्रशिक्षणार्थी म्हणून संधी दिली जावी यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, संबधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय राखून प्रयत्न करावेत. या उमेदवारांना आपण शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार रुपये, आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये असे विद्यावेतन देणार आहोत. त्यामुळे उद्योगांसह, सहकारी बँका, कृषी सहकारी पतसंस्था याठिकाणी मोठ्या संख्येने प्रशिणार्थीना संधी मिळणार आहे, त्यासाठी अशा रिक्त पदांची यादी करून, त्या-त्या जिल्ह्यांमध्ये प्रशिणार्थीना लगेच संधी उपलब्ध करून देता येणार आहे. यासाठी ऑनलाईन तसेच ऑफ लाईन या दोन्ही पद्धतींने नोंदणी करण्यात यावी. जिल्हा रोजगार कार्यालये, जिल्हा उद्योग केंद्र आदींनी विशेष बाब म्हणून प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.