आधार कार्ड रिसेडींग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकांना आदेश ; मंडलिकांच्या पाठपुराव्यास यश.

Kolhapur news
By -

 

           


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांच्या बँक  खात्यात रक्कम जमा होण्यात आधार कार्ड रिसेडींगची तांत्रिक  अडचण राष्ट्रीयकृत बँकांनी तातडीने सोडवावी असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.


  माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तर युवासेनेचे  पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक व मंडलिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याप्रश्नी जिल्हाधिकारी येडगे यांची भेट घेवून भुमिका मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे मंडलिकांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.


  जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेसंबंधी बोलताना ॲड. मंडलिक म्हणाले ," कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा लाख ९२ हजार ५१३  अर्ज मंजूर झाले.  त्यापैकी पाच लाख ५४ हजार ३९४ महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा झाले. मात्र आधार कार्ड बँक अकाउंटला सीडींग नसल्यामुळे एक लाख ३८ हजार ११९ पात्र  लाभार्थी महिलांच्या खात्यात  या योजनेचे पैसे  जमा  हाेण्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या. 


   त्यामुळे या प्रश्नी  थेट जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेवून व्यक्तीश: लक्ष घालण्याची विनंती ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मुरगुड चे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके ,उपनगराध्यक्ष जयसिंगराव  भोसले,माजी नगरसेवक एस.व्ही चौगले, किरण गवाणकर, दीपक शिंदे, दत्तात्रय मंडलिक, अक्षय शिंदे, राजू कांबळे आदी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने केली. 


 जिल्हाधिकारी येडगे यांनी या प्रश्नाचे  गांभीर्य ओळखून राष्ट्रीयकृत बँकांकडून आधार कार्ड बँक खात्याला सीडींग करण्यास विलंब होत असल्याची माहिती घेत राष्ट्रीयकृत बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन  पैसे जमा होण्यास होत असलेला अडथळा दूर करण्याचे आदेश काढले.