कोल्हापूर न्यूज नेटवर्क
बिजगर्णी येथील सदानंद मोरे यांच्या गाईची २८ महिन्यांची पाडी गाभण न जाताच रोज दोन लिटर दूध देत असून परिसरात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. ही पाडी २८ महिन्यांची असून ती अद्याप एकदाही गाभण गेलेली नाही किंवा व्यालेली नाही. मोरे यांच्या गोठ्यातील नऊ जनावरांपैकी एक असलेल्या पाडीच्या कासेचा आकार वाढल्याचे निदर्शनास आल्याने मोरे यांनी काही दिवसांपूर्वी पाडीची कास व स्तन दाबून दूध येते का पाहिले असता त्यातून दूध येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी दूध काढण्यास सुरुवात केली.
सध्या हे रोजचे काढलेले दोन लिटर दूध डेअरीला घातले जात आहे. या दुर्मिळ घटनेची परिसरात आश्चर्य मिश्रित चर्चा होत असून शेतकरी व दूध उत्पादक वर्गात हा कुतूहलाचा विषय बनला आहे. दूध देणारी ही पाडी पाहण्यासाठी मोरे यांच्या बेळगाव जिल्ह्यातील बिजगर्णी येथील घरी गर्दी होत आहे.

