कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले , ज्येष्ठ पत्रकार
वस्ताद येणार आहेत म्हणे.कोण वस्ताद हे अजून कळायला वेळ आहे.
तूर्त एवढंच की जनता म्हणजे
"वस्तादोंकी वस्ताद" असते.
वस्ताद या शब्दाला खुप चांगला अर्थ आहे.शिष्याला उत्तमोत्तम डावपेच शिकवून त्याला विजयी कसे करायचे हे कौशल्य वस्तादाकडे असावे लागते.कुटील डाव शिकवणारा हा वस्ताद नसतो.
गेल्या पन्नास वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास डोळ्या खालून घाला.
आठवा तो स्वातंत्र्यवीर वसंत दादांचा चेहेरा.समोर व्यासपीठ.ज्यांना बोटाला धरून दादांनी राजकारणात आणले त्यातला कोणीतरी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होता.दादा डोळे विस्फारून ते दृश्य पहात होते.
माझं काय चुकलं?
ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत तुरुंग वास भोगला.तुरुंगातून सुटण्यासाठी भारत माता की जय म्हणून कृष्णेच्या पुरात उडी मारली.हजारो देशभक्त जीवावर उदार होऊन माझ्या मागे उभे राहिले.
मागून मात्र वार कधीच कुणी केला नाही.
दादांचं विषण्ण मन त्यांच्या चेहेऱ्यावर येऊन थबकलं होतं. महाराष्ट्राला तो चेहेरा आजही आठवत असेल.
शिवरायांचा जयजयकार तेथे थांबला होता.भारत मातेचा जयजयकार तेथे सुन्न झाला होता.
फसवा फसवी आणि मांडवलीच राजकारण तेथूनच सुरू झालं होतं.
दादा माळावर उभं राहून सुध्दा माणसं गोळा करायचे . मुठी आवळून जयजयकार करायची.
" छ्त्रपती शिवाजी महाराज की जय."
"स्वातंत्र्य सेनानी वसंत दादांचा विजय असो."
" दादा तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ हैं."
त्या दिवसापासून सगळं राजकारण सुध्दा बदलून गेलं.
फसवा फसवी आणि मांडवलीचं राजकारण सुरू झालं.समाजाला जाती पातीत वाटणं सुरू झालं.
डालग्या खाली कोंबडं झाकावं त्याप्रमाणे शिवरायांच्या घोषणा सुध्दा झाकल्या गेल्या.
गुळाच्या ढेकळाला डोंगळे चिकटावेत तसे सत्तेच्या खुर्चीला सत्तापिपासू चिकटू लागले.
कुठली निष्ठा आणि कुठले काय ?
पापं लपवायला यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या स्वातंत्र्य योध्याला गुरू मानलं की झालं.
राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो हे वाक्य तेंव्हा पासून बाजारात आलं.
भोळ्या भाबड्या जनतेला यातलं कांहीच कळत नव्हतं.
काहीं हूजरे भोवताली जमा झाले.
व्वा ! किती मुरब्बी राजकारणी !असं म्हणू लागले.
सिंहासन सारखे चित्रपट निघाले.
महाराष्ट्राची जनता सुन्न झाली होती.
या मदारी माणसाला आता वस्ताद म्हणू लागले आहेत.
या वस्तादाला पाहून तांबडी माती सुध्दा आता अंग चोरू लागेल .
वस्ताद येणार म्हणे.
येऊ देत.
वस्तादों की वस्ताद मात्र जनताच आहे.
आता ती पहिल्या सारखी भोळी भाबडी राहिली नाही.
बोटावर नाचवायची ताकद ती बाळगून आहे.
-------------------------------------------------------------

