भारतीय प्रशासन सेवेचे 'भूषण' ; देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेचे सेवानिवृत्त आयुक्त, कोल्हापूरचे सुपुत्र भूषण गगराणी

Kolhapur news
By -

 

                   




                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क    



  अतिशय देखणं व्यक्तिमत्त्व. कामातही स्मार्ट. सुसंस्कृत. मोठ्या पदावर काम आणि कामात वेगळेपण. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सर्व काम बौद्धिक देऊन शांतपणे करून घेण्याची हातोटी. जनहिताय अशा स्वरूपाचे काम. इतकं असूनही कधीही याचा मोठेपणा, दिखाऊपणा नाही. कुणावर दबाव टाकणे नाही. हे व्यक्तिमत्त्व आहे, कोल्हापूरचं! भारतातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भूषण अशोक गगराणी! भूषणदादा ३१ मार्चला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्याविषयी....! 


भूषण दादांचे वडील माध्यमिक शिक्षक. ते ही उपक्रमशील शिक्षक. दादांच्या आई- वडिलांना वाचनाची आवड. दोघेही सामाजिक बांधिलकी जपणारे. हेच संस्कार दादा व कविताताई (भूषण दादांची बहिण) यांच्यावर झाले. गगराणी काका आणि मृत्यूंजयकार शिवाजीराव सावंत यांची जिवलग मैत्री. मृत्यूंजय करांनानाही नेहमीच भूषण दादा व कविताताई यांचे कौतुक वाटायचे. त्यांनी या दोघांचा एका पुस्तकात तसा उल्लेखही केला आहे. भूषण दादा शिकत होते याचबरोबर इतर कार्यक्रम, उपक्रमातही हिरारीने सहभाग घ्यायचे. त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा गाजवल्या. या स्पर्धांचा त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी खूप उपयोग झाला. एकतर अचूक, मुद्देसूद, कमी शब्दात लिखाणाची सवय लागली. वक्तृत्व स्पर्धेमुळे संभाषण कौशल्य प्राप्त झाले. या दोन्ही स्पर्धांमुळे धैर्य आणि आत्मविश्वास आला. याचबरोबर तितकेच महत्त्वाचे हे की स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून दादांना स्पर्धा परिक्षेची पुस्तके खरेदी करता आली. स्पर्धा परिक्षेसाठी होणारा बराचसा खर्च दादांच्या बक्षिसांच्या रकमेतूनच झाला. दादा शाळा-महाविद्यालयाचा अभ्यास व स्पर्धा यांचे अचूक नियोजन करायचे आणि यशस्वी देखील व्हायचे. ही सवय दादांना विद्यार्थी दशेपासूनच लागली. स्पर्धा परिक्षेत रॅकर होण्यासाठी आणि अधिकारी म्हणून काम करताना या सवयीचा खूप उपयोग दादांना झाला.


 भूषण दादांचे मराठी माध्यमातूनच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. भूषण दादांचे कोल्हापुरातील कोल्हापूर हायस्कूल, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, देशभक्त रत्नापाआण्णा कुंभार काॅलेज आॅफ काॅमर्स या शिक्षण संस्थांतून माध्यमिक, बी. काॅम., एम. काॅम. पर्यंत शिक्षण झाले. दादांचे वाणिज्य शाखेतून जरी पदवी, पदव्युत्तर शिक्षण विशेष श्रेणीतून झाले असले तरी त्यांचे  मराठी साहित्याचे व इतिहासाचे अफाट वाचन होते.

 आई-वडीलांनाही वाचनाची आवड होतीच. मुलं अनुकरणप्रिय असतात. हेच वाचन संस्कार लहानपणापासून भूषण दादांच्यावर होत गेले. भूषण दादांचे वडील - अशोक गगराणी जेव्हा शिक्षक म्हणून कोल्हापूरात कार्यरत होते. त्याच दरम्यान मृत्युजयकार शिवाजीराव सावंत मेन राजाराम हायस्कूलमध्ये कार्यरत होते. दोघेही साहित्यप्रेमी आणि अभ्यासक. यामुळे हे दोघे खास मित्र झाले. या दोघांच्या मराठी साहित्यावरील आणि ऐतिहासिक विषयावर वारंवार गप्पा रंगायच्या. यांचाच प्रभाव भूषण दादा आणि कविता ताई यांच्यावर पडला. या दोघांनी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांमध्ये शालेय जीवनापासून भाग घ्यायला सुरुवात केली. या दोघांना  गगराणी काका आणि मृत्युंजयकार मार्गदर्शन करायचे आणि प्रोत्साहन द्यायचे. अशा साहित्यिक वातावरणात भूषण दादा आणि कविता ताई घडत गेले. ऐतिहासिक वाचनामुळे भूषण दादांच्यात जोष संचारला. त्यांचा जोष वक्तृत्व, निबंध स्पर्धेतून दिसायचा. राष्ट्रीय स्पर्धेतही भूषण दादांनी पारितोषिके मिळवली. महाविद्यालयीन जीवनात वाणिज्य शाखेचा अभ्यास करत असताना, या अभ्यासाकडे जराही दुर्लक्ष न करता भूषण दादा राष्ट्रीय स्पर्धा गाजवत होते. या स्पर्धेतील यशामुळे भूषण दादांच्यात जबरदस्त आत्मविश्वास आला. गगराणी काका भूषण दादांना उद्योग-व्यवसायात उतरविणार होते पण दादांनी लहानपणापासून वेगळेच वळण घेतले. अर्थात वाटेवरील अडथळे गगराणी काका आणि काकींनी दूर केले. यामुळे आणि अथक बौद्धिक मेहनतीने भूषण दादांनी स्विकारलेल्या वेगळ्या रस्त्याचे शिखर गाठले. 


भूषण दादांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९० साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परिक्षेत भूषणदादा महाराष्ट्रात पहिले व देशात तिसरे आले. त्यांनी या परिक्षेत मराठी आणि इतिहास हे मुख्य विषय ठेवले होते. विशेष म्हणजे त्यांनी संघ लोकसेवा आयोगाची परिक्षा मराठी माध्यमातून दिली.  ही परीक्षा मराठी माध्यमातून देणारे भूषण दादा देशातील पहिले विद्यार्थी होय. दादांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर चंद्रपूर, राजूर या ठिकाणी सहायक जिल्हाधिकारी -परिक्षाविधीन कालावधी पूर्ण केला. यवतमाळ येथून ते स्वतंत्रपणे कार्यरत झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रथम त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर संभाजी नगर येथे दादांची बदली झाली. तेथून ते पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाचे संचालकपदी कार्यरत झाले. 


भूषण दादांना जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळाली. हा जिल्हा नव्यानेच स्थापन झाला होता. यामुळे त्या ठिकाणी विविध स्वरूपाचे काम करण्याचे मोठे आव्हान होते. मात्र हे आव्हान दादांनी लिलया पेललं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी भूषणदादांचा मोलाचा हातभार लागला. त्यांच्या सोबत काम करणारे अधिकारी -कर्मचारी अवार्जून भूषणदादांचे नाव काढतात. दादा कामात तत्पर होते. जिल्हाधिकारी असूनही ते कधीच कुणावर रागावत नसायचे. कामाचा आढावा घेताना अपुरे काम त्यांच्या निदर्शनास आले तरी ते रागावत नसत. मात्र त्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यास असा काही बौद्धिक डोस द्यायचे की परत कामात हलगर्जीपणा होणार नाही. दादा शांतपणे अपेक्षित काम प्रत्येकाकडून करून घ्यायचे. दादांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहेच शिवाय त्यांचे मानसशास्त्र देखील चांगले आहे. या दोन अस्त्रांचा दादा अचूक उपयोग करत असायचे.


सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सेवेनंतर भूषण दादांनी महाराष्ट्र राज्याचे  पर्यटन सचिव, आरोग्य सचिव ,सांस्कृतिक सचिव, माहिती व प्रसिद्धी महासंचालक , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संचालक, सिडको संचालक, मुख्यमंत्र्यांचे सचिव व प्रधान सचिव म्हणून जबाबदार्‍या सक्षमपणे पार पाडल्या. 


माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. आपल्या ज्ञानेंद्रियाव्दारे माहिती, अनुभवातून शिकत असतो. हे शिक्षण अनौपचारिक असते. माणसाचे हे शिक्षण निरंतर सुरू असते. याचबरोबर भूषणदादा औपचारिक शिक्षण नोकरीत असेपर्यंत घेत राहिले. त्यांनी बी. काॅम, , एम. काॅम. या पदव्या युपीएससी परिक्षेपुर्वीच मिळविल्या होत्या. आय. ए. एस. च्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत भूषण दादांनी एम. ए., एम. बी. ए., एल. एल. बी. पीएच. डी. या पदव्या देशातील आणि परदेशातील नामवंत विद्यापीठातून मिळविल्या. विशेष म्हणजे दादांनी  जाणिवपूर्वक घेतलेल्या या औपचारिक शिक्षणाचा उपयोग प्रशासन हाताळताना नेमकेपणाने केला. 


प्रशासनातील विविध पदे यशस्वीपणे सांभाळल्यानंतर दादांना उत्तरार्धात भारतातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेचे प्रशासक होण्याची संधी मिळाली. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रशासक होण्याची संधी बहुधा कुणाला मिळत नाही मात्र निवडणूका लांबल्याने ही संधी भूषण दादांना मिळाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मात्र या निवडणुकी विषयी आक्षेप कुणीही घेतला नाही. भूषणदादांच्या नेतृत्वाखाली पारदर्शकपणे निवडणूका पार पडल्या. नवीन सत्ता अस्तित्वात आल्यानंतर भूषण दादांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही काही महिने काम केले आणि ३१ मार्च, २०२६ ला सेवानिवृत्त झाले.


भूषणदादांनी प्रत्येक ठिकाणी काम करत असताना वेगळा ठसा उमटविला. दादांनी पर्यटन सचिव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक साहसी पर्यटनाचे प्रकार सुरू केले.  नवी मुंबई विमानतळाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पूर्णत्वास नेली.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा कारभार देखील वाढवून कार्यक्षेत्र विस्तारले. मेक इन इंडिया अंतर्गत अनेक योजनां राबविल्या. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे सांस्कृतिक व माहिती आणि प्रसिद्धी विभागात मोलाचे कार्य केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक व आयुक्त असताना अतिक्रमण निर्मूलन, कचरा व्यवस्थापन अशा अनेकविध कार्याची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. भूषण दादांनी प्रशासनाला मानवी चेहरा दिला.  


अत्यंत संयमी,  विवेकी,  शांत , मितभाषी,  संवेदनशील तितकेच कठोर,  धडाडीचे निर्णयक्षम आणि महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्धी पासून शेकडो मैल दूर असणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून डॉ भूषण गगराणी यांची ओळख आहे. ३६ वर्षे महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात उच्च पदावर काम केले. 


भूषण दादांचे वडील आदर्श शिक्षक. आई-वडील पुस्तकप्रेमी, सुसंस्कृत. अशा संस्कारांचा प्रभाव दादांच्या वर आजही आहे. दादांनी शिक्षणाचा-अभ्यासाचा ध्यास कधीच सोडला नाही. भूषणदादांनी प्रशासनातील विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सुसंस्कृतता जपली.  दादांनी उच्च पदावर काम केले. मोठं मोठ्या पदव्या मिळविल्या. पारदर्शक प्रशासनाबरोबरच विविध प्रयोग केले. जनता, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यात नेमका समन्वय साधून लोकहिताचे काम केले मात्र याचा कधीही आणि जराही बाऊ केला नाही. आरती ओवाळून घेतली नाही. म्हणूनच भूषणदादा भारतीय प्रशासन सेवेचे भूषणच आहेत.


          भारतभूषण केशव गिरी

         कदमवाडी, कोल्हापूर.

         दि. १९ /४/२०२६.


       ********************