कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर न्युज नेटवर्क च्या चॅनेलवरून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यतत्परते बद्दल एक बातमी झळकली. बातमी छोटीच होती पण वाचकांच्या ह्रदयाला जाऊन भिडणारी होती.नायकू गवाणे नावाच्या एका वृद्ध पित्यांने रुकडी फाट्यावर ना. प्रताप सरनाईक यांच्या गाड्यांचा ताफा अडवला व आपल्या मुलाच्या बदलीचा एक अर्ज त्यांच्या कडे दिला. गाडीतून उतरून त्यांनी फोन लावून एम डी ना आदेश दिले व त्याच दिवशी त्याची कोकणातून बदली कोल्हापुरात झाली. मंत्री महोदयांनी त्या वृद्धा कडे करुणेने पाहिले, त्याची व्यथा समजून घेतली. वृद्धापकाळात मुलगा आई वडिलांच्या जवळ असावा असे त्यांनी सांगितले. या घटनेतून त्यांच्या सह्रदय वृत्तीची व निर्णय क्षमतेची झलक पहायला मिळाली. गरजू आणि असहाय्य लोकांकडे केवळ डोळ्यांनी पाहू नका तर ह्रदयाने (सहानुभूतीने )पहा असा संदेश या घटनेतून मिळाला आहे.
एस टी महामंडळ ही एक फार मोठी उत्पादक संस्था आहे. हजारो चालक, वाहक, यंत्रज्ञ (मेकॅनिक ),कामगार व प्रशासकीय कर्मचारी रात्रंदिवस अविश्रांत काम करत असतात. शाळा, महाविद्यालये या सारख्या अनुत्पादक संस्थांच्या कामाची पद्धत वेगळी असते. त्यांना दिवसा सहा ते सात तास काम करावे लागते.तसे इथे नाही. एस टी ची चाके 24×7 सतत फिरत असतात.आर्थिक व्यवहार रोजच्या रोज होत असतात. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि अविश्रांत कष्ट यांना पर्याय नसतो.या स्वायत्त संस्थेला एका कर्तबगार नेतृत्वाची गरज होती. प्रताप सरनाईक यांच्या मुळे ती पूर्ण झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.त्यासाठी त्यांच्या जीवन प्रवासाचा थोडा आढावा घेऊ.माध्यमांना अधून मधून दिलेल्या मुलाखती तून त्यांच्या प्रेरक नेतृत्वाची छबी स्पष्ट झाली आहे.
ते सुरुवातीला रिक्षा चालक होते. अपुऱ्या उत्पन्ना मुळे कुटुंबातील सर्वांनाच काटकसरीची सवय लागली होती. रिक्षा व्यवसायातून कशी तरी दोन वेळेच्या भोजनाची सोय होऊन हाता तोंडाची गाठ पडायची. उत्पन्नाचे इतर पर्याय शोधले पाहिजेत असा विचार करून त्यांनी इतर छोटे मोठे व्यवसाय सुरु केले. अपुरे भांडवल व व्यावसायिक स्पर्धा भेडसावत होत्या. स्वस्थ बसून चालणारही नव्हते.कष्ट, प्रयत्न आणि सकारात्मक विचार या तिन्ही वर त्यांनी जोर दिला.कुसुमाग्रजांच्या 'कणा' या कवितेने अनेकांना लढायची प्रेरणा दिली आहे. या कवितेतील शेवटच्या दोन ओळी अशा आहेत.
". मोडला जरी संसार
तरी मोडला नाही कणा.
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा.!"
ही कविता त्यांना लढायची प्रेरणा देत होती.छत्रपती शिवरायांचा लढाऊ बाणा हाताला धरून ' 'उठ मावळ्या' असं म्हणून साद घालायचा, बाळासाहेब ठाकरे याचे प्रखर विचार व आनंद दिघे साहेबांच्या मठातून आलेले क्रांतीचे अंगार यातून मी शिवसैनीक बनलो. कुटुंब आणि अवती भवतीचा समाज यासाठी घाम गाळायचाच या जिद्दीतून एक यशस्वी असा उद्योजक बनलो. माझे नेते एकनाथजी शिंदे यांची अंगुली पकडून राजकारणात प्रवेश केला.
सर्व सामान्य माणसाला उभं करायचं, आधार द्यायचा असा प्रण माझ्या सर्व कुटुंबाने केला.एकनाथ जी शिंदे, श्रीकांतजी शिंदे यांनी हजारो गोर गरिबांसाठी सर्व सोयींनी युक्त असे हॉस्पिटल उभे केले आहे. शेतकऱ्यांच्या मदती साठी त्याच्या बांधापर्यंत धावत जाणाऱ्या आणि डगरी कोसळलेल्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी भर पावसात टेकडी चढून जाणाऱ्या एकनाथजी शिंदे यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवला आहे.
विचारांचची हीच शिदोरी घेऊन परिवहन खात्याच्या मंत्री पदाचा कार्यभार मी आज सांभाळत आहे.
मी शासक नाही सेवक आहे हेच भाव मनात जपले आहेत.
लाल परीची चाके जशी 24 तास फिरत रहातील तसे रात्रंदिवस काम करणाऱ्या एस टी च्या लाखो कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या संसाराची चक्रे सुद्धा फिरत राहिली पाहिजेत. ती थांबता कामा नयेत,हा आमचा ध्यास राहील.
ना.प्रताप सरनाईक यांच्या जीवनाचा हा प्रेरणादायी प्रवास वाचकांच्या समोर ठेवताना धन्यता वाटते. जनसामान्यांसाठी 'लढ म्हणा अशी प्रेरणा मिळते.
-------------------------------------

