कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहविचार सभेत आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या सभेमध्ये कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी अजय पाटील , विस्तार अधिकारी धनाजी पाटील यांनी आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया विनाअडथळा पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.
दहावीच्या निकालांनंतर विद्यार्थ्यांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्यापासून ते गुणवत्ता यादी जाहीर होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष मदत केंद्रे कार्यान्वित करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. तसेच, कोट्यांतर्गत प्रवेशांचे नियम पाळून सर्व पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.
दुसरीकडे, शिक्षक भरतीसाठीच्या पवित्र पोर्टल प्रणालीबाबतही या बैठकीत महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला. पवित्र पोर्टलद्वारे होणारी भरती ही पूर्णपणे 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' (TAIT) मधील गुणांच्या आधारावर होत असल्याने, शाळांमधील रिक्त पदांची माहिती आणि 'बिंदूनामावली' (Roaster) अचूकपणे अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खासगी शाळांमधील मुलाखतीसह भरती आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील नियुक्त्या या प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या प्रणालीमुळे शिक्षण क्षेत्रात पात्र उमेदवारांना संधी मिळून शाळांची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याचबरोबर शाळांच्या गुणात्मक विकासासाठी 'शालेय गुणवत्ता आश्वासन आणि मानांकन आराखडा' (SQAAF) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती निमित्त वर्षभर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले. शाळांची वार्षिक तपासणी, संच मान्यता आणि प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांबाबत वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पुढील शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण नियोजन आणि 'मूल्यांकन शाळा' उपक्रमांतर्गत शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी करावयाचे प्रयत्न यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
------------------------------

