शिवराय माफीवीरांना कळणार नाहीत - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Kolhapur news
By -

 

       


 मुंबई  : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूरत लुटीविषयी केलेल्या विधानाचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग भोगला. पण यांच्या लोकांनी माफीनामे लिहिले. त्यामुळे या माफीवीरांना स्वराज्यासाठी शिवछत्रपती व काँग्रेसने काय केले हे केव्हाच कळणार नाही, असे ते म्हणाले. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने शिवरायांनी सूरत लुटल्याचा खोटा इतिहास शिकवल्याचा दावा केला आणि विरोधकांनी पुन्हा सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.


पृथ्वीराज चव्हाण   म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सुशिक्षित आहेत. पंडित नेहरू यांचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे इंग्रजीतील मूळ पुस्तक आहे. या पुस्तकात शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीसाठी परकीयांवर आक्रमण केले, त्यांचे किल्ले, खजिना लुटला हे स्पष्टपणे लिहिले आहे. शिवरायांनी हे सर्वकाही स्वराज्य निर्मितीसाठी केले. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. पण ज्यांनी आयुष्यभर इंग्रजांची चाकरी केली, त्यांना याची कल्पना येणार नाही.