कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू", अशी घोषणा शरद पवारांनी केली.समरजित घाटगे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी मंगळवारी हाती घेतली. कागलमधील गैबी चौकात घाटगे यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवारांनी घाटगेंच्या उमेदवारीचीच घोषणा केली.
जबरदस्त संख्येने तुम्ही समरजित घाटगे यांच्यासाठी उपस्थित राहिलात. मी गैबी चौकात अनेकदा सभा घेतल्या, पण आजची गर्दी मी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही. मागे एकदा पक्ष फुटला त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी पाच वर्षात पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरची भूमी स्वाभिमान गहाण ठेवत नाही हे या सहकाऱ्यांनी दाखवून दिले असे शरद पवार म्हणाले.
कागलने कधीही लाचारी स्वीकारली नाही, तसा इथला इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पवारांनी दिला.
श्री पवार म्हणाले , या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही सर्वकाही दिलं. पण संकट आल्यानंतर साथ सोडून भलत्याच्या मागे गेले. त्यांच्यावर ईडीच्या काही चौकशा सुरू केल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कुटुंबीयांतील भगिनींनी ईडीने आम्हाला गोळ्या घालाव्या अशी भूमिका घेतली. पण त्यांचा कुटुंबप्रमुख लाचार होऊन भ्रष्टाचाऱ्यांच्या दारी गेला. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. घाटगेंचा पक्षप्रवेश ही परिवर्तनाची नांदी असल्यामुळे आता राज्यात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असंही शरद पवार म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या धर्मांध व्यक्तींच्या, सत्तेच्या मांडीला मांडी लावून जे बसले आहेत त्यांना धडा शिकवायचा आहे. गुजरातला घाबरून इतिहास बदलण्याचे पाप, कटकारस्थान राज्यात सुरू आहे. ती खपवून घेतली जाणार नाही.
समरजीत घाटगे म्हणाले, शरद पवार हे वस्तादांचे वस्ताद आहेत. कागल मध्ये त्यांनी परिवर्तन आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. कागलच्या जनतेने तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला संधी द्यावी.
प्रारंभीर जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उत्तम जानकर, शिवानंद माळी यांच्यासह इतरांची भाषणे झाली. मेळाव्यास आर. के. पोवार, सुवासिनीदेवी घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, नवोदिता घाटगे, नंदाताई बाभुळकर, रणजितसिंह पाटील, रामराजे कुपेकर, काकासाहेब पाटील, ए. वाय. पाटील, रोहित पाटील, पद्मजा तिवले, अनिल घाटगे, अश्विनी माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते


