घेता घेता देणाऱ्याचे दोन हात घ्यावेत ; आनंदा मांगले यांच्या एक्झीट मुळे ते हात गेले.

Kolhapur news
By -

 

          


               कोल्हापूर न्यूज  / वि.रा.भोसले


      कवी दत्ता हलसगीकर यांची एक सुंदर कविता आहे 

     ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत.

    त्यांच्याच एका कवितेत दोन ओळी आहेत.


  "देणाऱ्याने देत जावे  !

  घेणाऱ्याने घेत जावे 

 घेता घेता देणाऱ्याचे

    दोन हात घ्यावेत.!"


मुरगूड चे माजी नगरसेवक आणि एक यशस्वी उद्योजक आनंदा  मांगले  यांचे  अकस्मात निधन झाले.त्यांच्या प्रेतयात्रेला प्रचंड गर्दी होती.एखाद्या मोठ्या नेत्या सारखी.

    आनंद काहीं मोठा नेता नव्हता.त्याच्या नावातच  आनंद होता.त्यांना आनंदा असेच सर्व म्हणत होते.आनंदाचे दान करणारा असाच त्याचा अर्थ समजावा.

     दत्ता हलसगीकर  यांच्या कवितेत हुबेहूब बसणारे असे हे व्यक्तिमत्त्व होते.

     गरीबी त्यांच्या पाचवीला पुजली होती.प्राथमिक शिक्षण  झाले.त्यानंतर मुरगूड हायस्कूल मध्ये शिकत असताना मध्येच त्यांना शिक्षण सोडावे लागले कारण परिस्थिती आडवी आली.ही आठवण सांगताना त्यांच्या वर्गमित्रा चे डोळे पाणावले.

   आनंदाने कष्टाला खांद्यावर घेतले आणि आपला जीवन प्रवास सुरू केला.त्यांच्या हॉटेलचा आनंद वडा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.सकाळी सात वाजल्याासून मुरगूड नाक्यावर वाहनांची रांग लागलेली असते.ट्रक ड्रायव्हर ,टू व्हीलर वाले नोकरदार, कामगार मॉर्निंग वॉक वाले ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी सर्वांनाच आनंद वडा पाव खायचा असतो.बांधून घेऊन जायचा असतो.जोडीला,उप्पीट ,मिसळ,बटाटा कांदा भजी अशा अस्सल कोल्हापुरी  खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी बाळु मामांचे कर्नाटकी भक्त सुध्दा थबकतात.

   

     केवळ हॉटेल व्यवसाय नाही तर बैलगाड्यांच्या शर्यतीत सुध्दा त्यांना खुप रस होता.मुरगूडच्या या शर्यतींनी महाराष्ट्रात चांदा ते बांदा आणि कर्नाटकात अथनी,बिजापूर पर्यंत झेंडा फडकवला आहे . आनंदा मांगले यांचे योगदान फार मोठे आहे.

   पैसा संपत्ती हे फक्त साधन साधन आहे साध्य नाही हे सुंदर तत्व अल्प शिक्षित  आनंदा ने आयुष्यभर जोपासले.

   ते  काय फार मोठे उद्योजक नव्हते पण जे होते त्यातले ते गरजूंना वाटत गेले.त्यात  आजारी व्यक्ती,निराधार महिला भगिनी,विद्यार्थी असे सगळे होते.आपण शिकलो नाही निदान दुसरे तरी शिकू देत हा भाबडा विचार त्यांनी सतत जपला.

   पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक हे घटका भरात त्यांच्या प्रेत यात्रेत सामील झाले. महिलांनी देवाला जोडावेत तसे हात जोडले.त्यांच्या परिवारातील पोरे तर अक्षरशः हुंदके देत होती.

   यातच आनंदा च्या आयुष्याचे मोठेपण दडले आहे.

    ज्याची बाग फुलली त्याने दोन फुले द्यावीत.

   दान घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत.


आज ते हात आणि ती फुले दोन्ही हरवली आहेत.