कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्याचे नाव शाळेमध्ये पण शिकायला अकॅडमी मध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आला असून शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
माध्यमिक शिक्षण विभाग आता जिल्ह्यातील शाळांना अचानक सडन व्हिजिट देणार आहे. या शाळा तपासणीत विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेत कमी असेल आणि संबंधित विद्यार्थी जर खाजगी अकॅडमीत शिक्षण घेत असेल तर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी ऑगस्ट महिन्यात शाळा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळेत प्रवेश घेतलेले असंख्य विद्यार्थी वर्गात उपस्थित न राहता खाजगी अकॅडमीत शिकत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शालेय वेळेत विद्यार्थी शाळा बाहेर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध प्रकारच्या परीक्षेच्या तयारीसाठी मोठ मोठी फी देऊन अकॅडमी मध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील सगळया माध्यमिक शाळांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी शालेय वेळेत वर्गात उपस्थित राहतील यासंबंधी दक्षता घ्यावी असे कळविले होते. शाळेतील विद्यार्थी शालेय वेळेदरम्यान अकॅडमी मध्ये असल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासकीय कारवाई होईल असे नमूद केले होते. माध्यमिक शिक्षण विभागाने आता शाळा तपासणी करण्याचे ठरविले आहे. अचानक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासून "दूध का दूध आणि पाणी का पाणी" केले जाणार आहे.
-------------------