कोल्हापूर न्यूज नेटवर्क
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमात मागील आर्थिक वर्ष२०२४-२५ मध्ये कोल्हापूर शैक्षणिक विभागाने असाक्षर नोंदणी आणि साक्षरता परीक्षेत लक्ष्यभेदी कामगिरी केली आहे.
देश पातळीवर राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेने (एनआयओएस) २३ मार्च २०२५ रोजी घेतलेल्या उल्लास परीक्षेचा महाराष्ट्र राज्याचा निकाल १० जुलै रोजी नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेत राज्याचा निकाल ९८.७५ टक्के लागला आहे. यात कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.६३टक्के लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९९.७३ टक्के लागला आहे.
कोल्हापूर शैक्षणिक विभागात कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षा, पाचवी आठवी शिष्यवृत्ती, एनएमएमएस शिष्यवृत्ती, राष्ट्रीय संपादनूक सर्व्हे, आधार नोंदणी व पडताळणी, अपार नोंदणी, पीजीआय यासह शिक्षण विभागातील बहुतांश मापदंडात कोल्हापूर विभाग राज्यात पुढे आहे.
मागील दोन वर्षात कोल्हापूर विभाग उल्लास मध्ये पिछाडीवर होता. राज्य योजना कार्यालयाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि जिल्हा व तालुका स्तरावरील समित्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे विभागाने उल्लास मधील असाक्षर नोंदणीचे, परीक्षेस बसविण्याचे राज्यस्तरावरून देण्यात आलेले उद्दिष्ट (लक्ष्य)ओलांडले आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना) यांची तर तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.
मागीवर्षी सन २०२४- २५ मध्ये कोल्हापूर विभागास ६८,८७२ नोंदणीचे उद्दिष्ट होते. त्या अगोदरच्या वर्षी नोंदणी झालेले परंतु परीक्षेस बसू न शकलेले तसेच सुधारणा आवश्यक शेरा प्राप्त असलेले आणि चालू वर्षी देण्यात आलेले नोंदणीचे उद्दिष्ट असे मिळून ७४,८२७ असाक्षरांना परीक्षेस बसवण्याचे उद्दिष्ट होते. विभागात प्रत्यक्ष नोंदणी ८४,२१८ इतकी झाली. तर परीक्षेस ८३,५२९ बसले. त्यापैकी ८३,२२४ उत्तीर्ण झाले. केवळ ३०५ असाक्षरांना सुधारणा आवश्यक शेरा मिळाला आहे. जिल्हानिहाय विचार करता विभागात रत्नागिरी वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांनी लक्ष्यभेदी कामगिरी केली आहे.
राज्याचे योजना शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.कोल्हापूर जिल्ह्यास २३,७१० नोंदणीचे व २४,२९२ परीक्षेस बसवण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात नोंदणी ३०,०९९ इतकी झाली. तर परीक्षेस २९,४९३इतके बसले. त्यापैकी २९,४१३ इतके उत्तीर्ण झाले. केवळ ८० असाक्षरांना सुधारणा आवश्यक असा शेरा प्राप्त झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, योजना शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी अभिनंदन केले आहे.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मुल्यमापन चाचणी परीक्षेचा निकाल एनआयओएसच्या https://www.www.nios.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहे. उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र जिल्हा योजना शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत यथावकाश देण्यात येणार आहे.
----------------------
"उल्लास योजनेने आता सर्वत्र गती घेतली आहे. अद्यापही मोठा पल्ला गाठायचा आहे. नवसाक्षरांचे निरंतर शिक्षण सुरू राहण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
- राजेश क्षीरसागर,
विभागीय समन्वयक उल्लास,
तथा विभागीय अध्यक्ष
कोल्हापूर व कोकण मंडळ.
------------------------