आरक्षण मर्यादेची भिंत हटवणारच ; जातनिहाय जनगणना करणारच - राहुल गांधी

Kolhapur news
By -

            


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     पंतप्रधान मोदी काहीही करू देत, ते कितीही डान्स-गाना करू देत. भाजपवाले कितीही नाचू देत ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंत आम्ही तोडणारच. जातनिहाय जनगणनेचा कायदा आम्ही लोकसभा व राज्यसभेत करणार आहे. जगातील कोणतीही शक्ती त्यापासून आम्हाला रोखू शकत नाही. हा आमचा शब्द आहे आणि हवे तर तो मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे संविधान सन्मान संमेलनात इंडिया आघाडीचा पुढील कृती कार्यक्रम जाहीर केला.


या दोन गोष्टी केल्यानंतरच देशातील ९० टक्के समाज असलेल्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन समाजाच्या विकासाचे राजकारण सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या मांडणीला जोरदार प्रतिसाद दिला.


येथील हॉटेल सयाजीमधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते. काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. संविधान सन्मान परिषदेच्यावतीने त्याचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील बाराशे प्रतिनिधी त्यास उपस्थित होते. राहुल गांधी यांनी संविधानाच्या प्रतिमेला अभिवादन करूनच  भाषणाला सुरुवात केली . त्यांचे भाषण संपतात त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी तरुणांची झुंबड उडाली होती .