पुणे :वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती स्थिर आहे. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करू नये. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळावेत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्यामुळे गुरुवारी पहाटे तातडीने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आलेत. सुजात आंबेडकर यांनी गुरुवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकरांची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहनही केले.
--------------------

