१०० आणि २०० रुपयाचे स्टॅम्प आजपासून होणार बंद

Kolhapur news
By -

 


                  


    मुंबई :आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. १०० रुपयांच्या कामासाठी आता ४०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. कारण शासनाकडून आजपासून शंभर आणि दोनशे रुपयांचे मुद्रांक (स्टॅम्प) बंद करण्यात येणार आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांना पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर सर्व व्यवहार करावे लागणार आहे. किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा आता पाचशे रुपयांच्या मुद्रांक घेऊन व्यवहार करावे लागणार आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.


विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसेही टाकले आहेत. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडला. हो बोजा भरुन काढण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सरकारचा महसूल वाढावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.



कोणत्याही कामासाठी ५०० चा स्टॅम्प लागणार आहे. प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, विक्री करार अशी कामे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर केली जात होती. मात्र आता त्याच कामासाठी चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रासाठी दोनशे रुपयांचा स्टॅम्प वापरला जातो. आता त्यासाठी सुद्धा तीनशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. १०० आणि २०० रुपयांच्या स्टॅम्पवर होणाऱ्या कामांसाठी आता ५०० रुपयांचा स्टॅम्प खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला पैसे दिल्यानंतर आता आपल्या खिशातून किती जाणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.


सरकारी दस्तावेज, साधी नोटरी, बँकेतून कर्ज घ्यायचं असल्यास तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या शंभर, दोनशे रुपयांत स्टॅम्प पेपर केला जात होता तो आता इतिहासजमा होणार आहे. आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरच खरेदी नोटरी हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे . 


       ------------------------------------