बेंगलाेर: 18 ते 25 वयोगटातील तब्बल 7,000 हून अधिक विद्यार्थी आणि तरुण एचआयव्ही (HIV) बाधित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर परिस्थितीची नोंद घेत कर्नाटक सरकारने आता थेट अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) आणि पदवी महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही तपासणी आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक सोसायटीच्या (KSAPS) शिफारशीनुसार, 'विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठ' (VTU) आणि उच्च शिक्षण विभागाने पुढाकार घेत महाविद्यालयांमध्ये 'एकात्मिक आरोग्य शिबिरे' (IHCs) आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. 'डेक्कन क्रॉनिकल'ने अधिकृत आकडेवारीचा हवाला देत ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
राज्यातील तरुण पिढीमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण ज्या वेगाने वाढत आहे. त्याबाबत आरोग्य यंत्रणांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. 'नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन'च्या (NACO) 2024च्या अहवालानुसार भारतात एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत कर्नाटक राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकात सध्या सुमारे 2.60 लाख लोक एचआयव्हीसह जगत आहेत. परंतु त्यापैकी केवळ 2.05 लाख लोकच 'अँटीरेट्रोव्हायरल थेरपी' (ART) उपचार घेत आहेत. म्हणजेच आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार तब्बल 54 हजार लोकांना आपल्याला एचआयव्ही संसर्ग झाला आहे याची जाणीवच नाही.
KSAPS च्या आकडेवारीनुसार 18 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये एचआयव्ही संसर्गात मोठी वाढ झाली आहे. 2023-24 मध्ये या वयोगटातील एचआयव्हीबाधितांची संख्या 44,500 होती. ती 2025-26 मध्ये वाढून 66,600 वर पोहोचली आहे. यामध्ये 18 ते 25 वयोगटातील 7,000 हून अधिक विद्यार्थी व तरुण बाधित आढळल्याने प्रशासनाने महाविद्यालयांमध्ये जनजागृती आणि इच्छुक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यावर भर दिला आहे.
महाविद्यालयांना जनजागृती, समुपदेशन आणि चाचणी शिबिरे आयोजित करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी विद्यार्थ्यांची चाचणी पूर्णपणे ऐच्छिक असेल. विद्यार्थ्याने स्वतःहून संमती दिल्यानंतरच त्याची चाचणी केली जाईल. संसर्ग वेळेत ओळखून त्यावर तातडीने उपचार सुरू करणे आणि तरुणांमध्ये भीती ऐवजी जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांची गोपनीयता जपण्यासाठी KSAPS ने एक विशेष 'क्यूआर कोड' आधारित एचआयव्ही स्व-जोखीम मूल्यांकन टूल (HIV Self-Risk Assessment Tool) सुरू केले आहे. विद्यार्थी आपल्या मोबाईलवरून हा क्यूआर कोड स्कॅन करून स्वतःच्या वागणुकीच्या आणि संभाव्य धोक्याच्या आधारे एचआयव्ही संसर्गाची जोखीम गोपनीयतेने तपासू शकतात. या टूलद्वारे विद्यार्थ्यांना जवळच्या आरोग्य केंद्राची माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ही संपूर्ण मोहीम KSAPS च्या 'मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा' (MAS) या उपक्रमाचा एक भाग आहे. या कार्यक्रमांतर्गत खालील ३ प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. 95% एचआयव्हीबाधित लोकांना त्यांच्या आजाराची माहिती असावी. 95% निदान झालेल्या रुग्णांना उपचारांशी जोडले जावे. 99% रुग्णांमधील व्हायरसचा प्रभाव कमी करून (Viral Suppression) संसर्ग पसरण्यापासून रोखणे.महाविद्यालयांमध्ये राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेमुळे हे लक्ष्य गाठणे आणि तरुण पिढीला सुरक्षित ठेवणे शक्य होईल, असा विश्वास आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारी, अनुदानित आणि खाजगी अशा सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये ही शिबिरे घेतली जाणार असली, तरी कोणत्याही विद्यार्थ्याची संमतीशिवाय तपासणी केली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
----------------------

