कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगुड ची होतकरू कुस्तीपटू पै. तन्वी गुंडेश मगदूम हिची दि. १६ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान स्लोव्हाकिया येथे होणाऱ्या २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी मुलींच्या ५७ किलो वजनगटात भारतीय महिला कुस्ती संघात निवड झाली आहे.
ही निवड केवळ तन्वीच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असून, मुरगुडच्या समृद्ध कुस्ती परंपरेचा आणि मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुलातील दर्जेदार प्रशिक्षणाचा गौरव आहे. विशेष म्हणजे, २०२६ या एकाच वर्षात संकुलातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारी तन्वी ही चौथी खेळाडू ठरली आहे.
अथक परिश्रम, शिस्त, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तन्वीने जागतिक स्पर्धेत दिमाखात प्रवेश मिळवला आहे. तिचे हे यश राज्यातील आणि देशातील असंख्य युवा महिला कुस्तीपटूंना नवी प्रेरणा देणारे आहे.
संकुलाचे कुटुंब प्रमुख माजी खासदार संजय दादा मंडलिक, कार्याध्यक्ष ॲड. विरेंद्र भैय्या मंडलिक, साईचे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण सर, माजी उत्पादन शुल्क सहआयुक्त सुनील चव्हाण साहेब आणि डॉ. प्रशांत अथनी यांनी तन्वी तसेच तिचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक पै. दादासो लवटे आणि पै. दयानंद खतकर यांचे अभिनंदन करून जागतिक स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
---------------------------

