कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी चॅरिटेबल ट्रस्ट यांची पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाली आहे. टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल-रुक्मिणीच्या नामघोषाने आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.
प्रवासादरम्यान हात्तीद येथे दिंडीचे भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी पारंपरिक बकऱ्यांचा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. शेकडो बकऱ्यांनी रिंगणात सहभाग घेतल्याने हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीचे स्वागत केले. भगवे ध्वज, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे हात्तीद परिसरात वारकरी परंपरेचा अनोखा उत्साह अनुभवायला मिळाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात वाटचाल करत असून, मार्गातील विविध गावांमध्ये दिंडीचे उत्साहाने स्वागत केले जात आहे. बकऱ्यांच्या रिंगण सोहळ्याने यंदाच्या दिंडी सोहळ्यात विशेष आकर्षण निर्माण केले.
----------------------


