कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सेवा जेष्ठता क्रमांकानुसार अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचारी यांचे समुपदेशनाने त्यांनी निवड केलेल्या शाळेत त्यांचे समायोजन करण्यात आले. या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेले आहे. सदर समायोजन प्रक्रियेमध्ये खाजगी अनुदानित शाळा कडील 8 प्रयोगशाळा सहाय्यक व अल्पसंख्यांक संस्थेतील 1 प्रयोगशाळा सहाय्यक यांचे समायोजन करण्यात आलेले आहे. तसेच उर्वरित 8 प्रयोगशाळा सहाय्यक यांचे नाव मा शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर यांच्याकडे विभाग स्तरावर समायोजन प्रक्रियेसाठी कळविण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिध्दीस माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांनी दिली आहे.
सन 2023-24 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेले प्रयोगशाळा सहाय्यक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी मुख्याध्यापक संघ ,कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सदर समायोजनासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. एकनाथ आंबोकर जिल्हा परिषद कोल्हापूर,उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, अजय पाटील, गजानन उकिर्डे, विस्तार अधिकारी डी.ए.पाटील, रत्नप्रभा दबडे, जयश्री जाधव, डी. टी. कुंभार, वेतन पथक अधिक्षक प्रविण फाटक, माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयीन कर्मचारी यांनी कामकाज पूर्ण केले .सदर समायोजनाच्या वेळी संस्था पदाधिकारी शाळा मुख्याध्यापक,संघटना पदाधिकारी, अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक व पत्रकार उपस्थित होते.
दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक या शिक्षकेतर अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे नियोजित केले होते. परंतु मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील प्रयोगशाळा सहायक पदासाठी दाखल याचिका तसेच संघटनेचे शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांना विनंतीवजा निवेदन याचा विचार करून विधानसभा निवडणूक कामकाज पूर्ण होईपर्यंत प्रयोगशाळा सहायक समायोजन कामकाजास तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात आल्याने खाजगी अनुदानित शाळाकडील 16 व अल्पसंख्यांक खाजगी अनुदानित शाळेकडील 3 असे एकूण 19 प्रयोगशाळा सहाय्यक यांचे समायोजन दिनांक 26-11-2024 रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले. प्रयोगशाळा सहाय्यक यांची रिक्त पदांची यादी एकूण 20 पदांमधील 9 पदे प्रस्तावित पदे असल्याने सदर ठिकाणी समायोजनाकरिता मागणी करता येणार नसल्याने केवळ 11 पदे रिक्त होती. तसेच अल्पसंख्यांक अनुदानित शाळेतील रिक्त पदांवर अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचारी हजर करून घेण्याबाबत संस्था व शाळा यांना शासन नियमाप्रमाणे स्वातंत्र्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
-------------------------------------------------
अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समायोजन मध्ये कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभाग राज्यात प्रथम असून , अभिनंदनीय कामगिरी आहे.
- महेश चोथे
शिक्षण उपसंचालक
-------------------------------------------------

