कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदानाबाबत आवश्यक तयारी झाली असून मतदानपूर्व काळात आदर्श आचासंहितेचे योग्य पालन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे आचरसंहिता उल्लंघन होवू देवू नका. तसे झाल्यास तात्काळ गुन्हे नोंदवावेत अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. शेवटचे 72 तास, 48 तास या कालावधीत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आचारसंहिता पालन झालीच पाहिजे. कुठेही अनियमितता दिसता कामा नये. स्थिर, फिरत्या पथकांची आवश्यकता वाटल्यास अजून त्यांच्या नेमणुका कराव्यात, मात्र कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होता कामा नये असे निर्देश त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हास्तरावर उपस्थित होते.
शेवटच्या कालावधीत प्रचार होत असताना होणारे आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष लक्ष देवून जबाबदारी पार पाडावी. कुठेही विनापरवानगी प्रचार सुरू राहता कामा नये. भरारी पथकांनी चांगल्या प्रकारे सनियंत्रण करून प्रचारावर बारीक लक्ष ठेवा. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही नेमकी कारणे शोधा. संशयित सार्वजनिक कार्यक्रमात काही आचारसंहितेचं उल्लंघन आढळून आल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी यावेळी दिल्या. रात्री 11.00 नंतर कुठेही हॉटेल सुरू राहणार नाहीत याचीही दक्षता घ्या व तसे कोणी आढळून आल्यास गुन्हे दाखल करा. फिरत्या पथकांचे सर्व कामांचे जिल्हास्तरावरून सनियंत्रण केले जाणार आहे. तसेच स्थिर पथकांनीही चांगल्या प्रकारे ॲक्टीव राहून कामे करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आता त्या त्या ठिकाणी भेटी देवून तपासणी करावी अशा सूचना त्यांनी पुढे दिल्या.
-------------------------

