कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आज राष्ट्रसंत गाडगे बाबांची पुण्यतिथी.गाडगे बाबांनी सामाजिक अंधश्रध्दा आणि मूर्ती पुजेचे अवडंबर यावर प्रहार करत ग्रामस्वच्छतेचा सुध्दा जोरदार पुरस्कार केला होता.त्यासाठी त्यांनी स्वतः झाडू हाती घेतला.
त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मुरगूड येथील युवकांनी मध्यवर्ती गाव तलावाची स्वच्छता करून त्यांना अभिवादन केले.
गाव तलाव हे ग्रामदेवता अंबाबाई मंदिरापासून अवघ्या तीस मिटरवर आहे. देवीच्या दर्शनासाठी येणारे असंख्य भाविक या रम्य तलावाकाठी कांहीं क्षण विसावतात.गावातील काहीं ठिकाणचे सांडपाणी या तलावात येऊन मिसळते.गावची काहीं धुणी सुध्दा येथे धुतली जातात.आसपासच्या कचऱ्याचे तर हे माहेरघरच.त्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटलेली असते.असा हा तलाव युवकांनी पाण्यात उतरून स्वच्छ केला.थंडी मी म्हणत होती तरीही सर्जेराव भाट या युवकाने त्या दुर्गंधी युक्त पाण्यात प्रवेश केला.कचरा आणि मासे यांना अंगावर घेत कचरा साफ केला.अन्य युवकांनी तितक्याच उत्साहाने त्याला साथ दिली.
गाव तलावाशिवाय या युवकांनी नदीचा दत्त घाट,स्मशान भूमी,ऑक्सीजन पार्क,छ्त्रपती शिवाजी विद्यामंदिर परिसर यांचीही स्वच्छता केली.नदीला मिळणारी पण कचऱ्याने तुंबलेली कांहीं गटारे सुध्दा त्यांनी साफ केली.
या स्वच्छता मोहिमेमुळे मात्र नदी काठावर भोजन पार्ट्या करणारे ओशाळून गेले कारण त्यांनी इतस्ततः फेकलेल्या पत्रावळ्या सुध्दा या युवकांनी गोळा केल्या.सकाळी सहा ते नऊ तीन तास अविश्रांत स्वच्छतेसाठी श्रमसेवा देणाऱ्या या युवकांचे नागरिकांनी मनापासून कौतुक केले. सहभागी अन्य युवक असे .ओंकार पोतदार,रंगराव चौगुले,तानाजी भराडे,जगदीश गुरव,संकेत शहा.
-------------------------------------------





