बाबासाहेबांचे अखेरचे २४ तास कसे होते

Kolhapur news
By -

 

            


     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम डॉ. सविता भीमराव आंबेडकर अर्थात माईसाहेबांनी  आपल्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात ' या पुस्तकात नमूद केला आहे... 


         6 डिसेंबर 1956 रोजी रोजी माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या. चहाचा ट्रे तयार करून बाबासाहेबांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेल्या. तेव्हा घड्याळात 7 साडेसात वाजले असतील. माईसाहेब लिहितात, खोलीत गेल्यानंतर पाहिले की, साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. मी त्यांना दोन-तीन वेळा आवाज दिला. पण त्यांची काहीच हालचाल दिसली नाही. मला वाटले, त्यांना गाढ झोप लागली असेल. नंतर मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठलेच नाही...


बाबासाहेबांचे झोपेतच महापरिनिर्वाण झाले होते. माईसाहेबांना प्रचंड धक्का बसला. त्या तिथेच ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्यावेळी बंगल्यात माईसाहेब व मदतनीस सुदामा हे दोघेच होते. माईसाहेबांनी हंबरडा फोडला. त्याच रडवेल्या आवाजात त्यांनी सुदामाला हाक मारली. तसेच डॉक्टर मालवणकर यांना फोन लावला. मालवणकरांनी त्यांना कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. पण बाबासाहेबांचे निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते. त्यामुळे इंजेक्शन देता आले नाही. मग माईसाहेबांनी नानकचंद रट्टू यांना बोलावण्यास सांगितले.


नानकचंद रट्टू धावतच पोहोचले. त्यानंतर कुणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागले, तर कुणी कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न करू लागले. पण काहीही उपयोग झाला नाही. बाबासाहेब सर्वांना सोडून निघून गेले होते. माईसाहेब पुढे सांगतात, आम्ही तिघांनीही विचार करून बाबासाहेबांच्या निधनाची बातमी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नानकचंद रट्टू यांनी ओळखीच्या प्रमुक व्यक्ती, सरकारी विभाग, पीटीआय, यूएनआय व आकाशवाणीला फोन करून बाबासाहेब गेल्याची वार्ता दिली.

           त्यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. आजही वयोवृद्ध लोक या घटनेची आठवण सांगताना म्हणतात की, बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी समजली आणि आम्ही वाट मिळेल तिकडे धावत सुटलो. अनेकजण धुळीने माखलेल्या रस्त्यावर लोळून ओक्साबोक्सी रडताना आम्ही पाहिले.

            -----------------------------