कोल्हापूर न्यूज / वि. रा. भोसले
गोकुळ ही आधी जिल्हास्तरावरील सहकारी दूधसंस्था होती. या संस्थेचे मूळ प्रवर्तक चुयेकर आनंदराव पाटील. ते असतांना रत्नाप्पा कुंभार गट व महादेवराव महाडिक यांनी या संघावर जाळे टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा आनंदराव पाटील यांनी बाळासाहेब माने व उदयसिंहराव गायकवाड या दोन खासदारांना गोकुळला वाचवण्याची विनंती केली .दोघांनी ही स्वतःचा कसलाही स्वार्थ न ठेवता आनंदराव पाटील चुयेकर यांना साथ दिली.नंतर मात्र ते एकटे पडत गेले.तमाम दूध उत्पादक संस्थांची सहानुभूती त्यांना होती. दूध तापलेले होते तोपर्यंत महादेवराव महाडिक खिडकीत स्वस्थ बसून होते. ते थोडे थंड झाले, साय दिसू लागली आणि त्यांनी खिडकीतून लगेच भांड्यावर उडी मारली. महाडिक गोकुळ मध्ये मोठे झाले.स्वतःच्या टँकरना त्यांनी गोकुळला जोडले.गोकुळने पश्चिम महाराष्ट्रात जम बसवला. मुंबईच्या परसात ही संस्था वाढू लागली.उत्पादकांच्या आपुलकीची जागा व्यापारी वृत्तीने घेतली.
स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी महाडिक आणि पार्टीला पहिला लाल सिग्नल दाखवला. गोकुळ च्या परिसरात एक सुंदर कृष्ण मंदिर आहे. मंदिरा समोरच महादेवराव महाडिक यांनी आनंदराव पाटील यांना म्हटलं.
"तुमच्या गोकुळ वर आता आमचे राज्य आहे."
बिचारे आनंदराव कांहीं बोलले नाहीत.मनातले सगळे आर्त भाव सर्व मात्र त्यांच्या चेहेऱ्यावर स्थापित झाले होते. डोळे डबडबले होते.ते एकाकी होते. मंदिरातील कन्हैया हे सगळं पहात असावा.त्याची बासरी मुग्ध झाली होती.आनंदराव पाटील गेले आणि महाविकास आघाडीने ना.मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गोकुळचे सारथ्य हाती घेतले. महाडिक पर्व संपविण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे विधान परिषद आमदार सतेज पाटील यांना जवळ केले.राष्ट्रवादीत फूट पडून अजित दादा व त्यांच्या बरोबर मुश्रीफ पण महायुतीत दाखल झाले.
गोकुळ आता नेमके कोणाकडे ?
गोकुळ च्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत.दुध संस्थांचे प्रतिनिधी हे गोकुळचे मतदार असतात.दूध उत्पादकांचे ते प्रतिनिधि मानले जातात.अर्थात उत्पादकांच्या आर्थिक हिताचा ते दुरान्वयाने सुद्धा विचार करत नसतात. आपला वाडगा कसा भरेल एवढाच विचार ते करतात.साखर कारखाने व गोकुळ यांच्यात नेमका हाच फरकआहे.थोडक्यात गोकुळ मधील लोकशाही केंव्हाच झोपी गेली आहे.आता तर ती जाम घोरु लागली आहे. डोंगळे यांचे बंड म्हणजे कृष्णाच्या त्या मंदिरातील घंटानाद असावा.कोणी त्याला स्वार्थ असेही म्हणेल. हाच शब्द इतरांना सुद्धा लागू पडेल.सगळेच हंडी फोडायला सज्ज आहेत.मनोरे कोल्हापुरात की मुंबईत उभे करायचे ते अजून ठरायचे आहे.
--------------------------------