कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राज्यातील सर्व माध्यम, व्यवस्थापन व अल्पसंख्यांक दर्जासह उच्च माध्यमिक शाळा ,स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यांच्याशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन करण्यात येणार आहेत.
अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी दिली आहे.
या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना एका वेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखापैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
दहावी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज व प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार सर्वसाधारण चार फेऱ्यात होणार असून यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहील. महाराष्ट्र राज्यमंडळ संलग्नित इयत्ता दहावी मधील विषयांच्या उच्चतम पाच विषयांचे गुण गुणवत्तेसाठी विचारात घेण्यात येतील. राज्य मंडळा व्यतिरिक्त इतर मंडळाच्या माध्यमिक स्तरावरील इयत्ता दहावी मधील माहिती तंत्रज्ञान व तस्सम विषय वगळता अन्य पाच विषयातील उच्चतम गुण हे गुणवत्तेसाठी विचारात घेण्यात येतील.
समान गुणवत्तेचे दोन किंवा अधिक उमेदवार असल्यास जन्म दिनांकाच्या ज्येष्ठतम विद्यार्थ्यांच्या प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल. गुण व जन्मतारीख समान असल्यास विद्यार्थी/ पालक/ आडनाव इंग्रजीमध्ये घेऊन वर्णाक्षराच्या क्रमाप्रमाणे ज्येष्ठतेनुसार प्रवेश देण्यात येईल.
अल्पसंख्या उच्च माध्यमिक विद्यालय /कनिष्ठ महाविद्यालयात अल्पसंख्यांक कोटा 50% असेल .
सर्व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयात व्यवस्थापन कोठ्या अंतर्गत 5% जागा आरक्षित असतील. शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक विद्यालयांना/ कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोठा लागू नाही.
उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात परिसरात त्याच संस्थेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 10% टक्के इन हाऊस कोटा आरक्षित असेल. तसेच शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांना इनहाऊस कोटा 50% असेल. याकरता दहावी परीक्षा राज्यातील शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमिक शाळेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
प्रवेशाच्या सर्वसाधारण गुणवत्तेनुसार चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली (ओपन फॉर ऑल) या विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रिक्त जागा दाखवण्यात येतील.
प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे स्वतःचा जातीचा दाखला उपलब्ध असावा तो नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल.विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करताना अथवा प्रवेशानंतर विषयांमध्ये बदल केल्यास शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेली शुल्क विद्यार्थ्यास भरणे बंधनकारक राहील.
नोंदणी करता प्रति विद्यार्थी 100 रुपये प्रवेश फी ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे.शैक्षणिक सत्र 25 - 26 पासून HSVP व्यावसायिक चे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने होतील. सदर प्रवेश प्रक्रियेचे सनियंत्रण करण्यासाठी राज्य/ विभाग/ जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे शिक्षणाधिकारी माध्यमिक आहेत.
-----------------------------------