सन २०२४-२०२५ च्या सेवक संचानुसार रिक्त-अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रीया थांबवावी : जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मागणी

Kolhapur news
By -

 

            


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       सन २०२४ -२५ सेवक संच्यानुसार रिक्त अतिरिक्त शिक्षकांची समोयजन प्रक्रिया थांबवावी या मागणीचे जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड,  चेअरमन राहुल पवार ,सचिव आर. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले. 


प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे लेखी निवेदन अधिक्षक उदय सरनाईक यांनी स्विकारले

 

  लेखी निवेदनातील आशय असा की,शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा सेवक संच दि. १५ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयानुसार झालेला आहे. सेवक संच सध्या शाळांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर सेवक संचामध्ये प्रत्येक जिल्ह्यात १० ते १५% शाळांमध्ये शिक्षकांची शून्य (०) पदे मंजूर झालेली आहेत. तर कांही शाळांमध्ये इ. ९ वी १० वी च्या गटात शून्य (०) पदे आलेली आहेत. कांही शाळांची सेवक संच चुकीचे आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची माहीती घेतली असता दि. १५ मार्च, २०२४ च्या या शासन निर्णयाचा खूप मोठा फटका मराठी शाळांना बसलेला आहे.

 

 सदर शिक्षकांचे लगेचच समायोजन करण्यासाठी आपण संदर्भाकिंत पत्रानुसार माहिती मागविलेली आहे. या मराठी शाळा शिक्षकांअभावी बंद पडल्यातर डोंगरी भागातील, ग्रामीण भागातील शेतक-यांच्या कष्टक-यांचे मुलांचे शिक्षणच बंद होणार आहे. दि. १५ मार्च, २०२४ च्या या शासन निर्णयातील सेवक संचाच्या विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे पदाधिकारी नाम. शिक्षणमंत्री महोदय, मा. शिक्षण आयुक्त, मा. शिक्षण संचालक यांच्या बरोबर बैठक घेऊन विद्यार्थी संख्येचे निकष बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कांही जिल्ह्यातील संस्थाचालक व मुख्याध्यापक संघटना यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे व सदर शासन निर्णयानुसार सेवक संच प्रक्रीयेला स्थिगीती मिळवलेली आहे असे समजते.

 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने सदर समायोजन प्रक्रीयेला कांही कालावधीसाठी स्थिगीती द्यावी व शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करणे संदर्भात महामंडळाच्या पदाधिकारी यांच्या बरोबर सहविचार सभा घ्यावी असे पत्र मा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिलेले आहे. तेव्हा आपणही पुढील आदेशा होईपर्यंत रिक्त-अतिरिक्त पदांची मागविलेली माहिती कांही कालावधीकरिता स्थगित करावी ही विनंती कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर करीत आहे.


 या शिष्टमंडळामध्ये बी. जी. बोराडे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, इरफान अन्सारी ,पंडीत पवार ,शिवाजी कुरणे, संदीप पाथरे, संभाजी पुजारी, पोपट पाटील आदी उपस्थित होते.



 लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना देताना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड,  चेअरमन राहुल पवार ,सचिव आर वाय पाटील  शेजारी अन्य मान्यवर


      ---------------------------------