कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीसह हजारो लोकांचे जनआंदोलन सुरु आहे.
कोल्हापुर- सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात प्रश्न मांडले तरी त्याची दखल घेतली गेली नाही. येत्या काळात हा लढा असाच चालू ठेवला नाही तर अलमट्टी धरणाचे भूत कायम आपल्या मानगुटीवर असणार आहे. कृष्णा लवादाला आंदोलकांनी हरकती पाठवल्या आहेत. आता सर्वांनीच दिल्लीपर्यंत त्या पाठवून रस्त्यावरच्या लढाईसोबतच कागदपत्रांची कायदेशीर लढाई लढली पाहिजे असा निर्धार यावेळी करण्यात आला.
कर्नाटक राज्याने केंद्राकडे अलमट्टी धरणाच्या उंची वाढीसाठी 1 लाख कोटींच्या निधीची मागणी केली असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांनी या विरोधात लेखी भूमिका मांडावी असा आग्रह आहे.
तसेच या मुद्द्याविरोधात ज्या पद्धतीने तेलंगणा राज्याने सुप्रिम कोर्टात जाण्याची भुमिका घेतली आहे. तशीच महाराष्ट्र सरकारनेही विरोधाची भूमिका ठोस कारणासह केंद्रसरकार समोर मांडावी, गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा मार्ग अवलंबावा अशी मागणी यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
नव्याने एक समिती स्थापन करून त्यात पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या भागातील शेतकरी आणि अभ्यासू लोकांचा समावेश करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली.
या मुद्द्यावर 21 तारखेला राज्यशासनाकडून बैठक बोलवण्यात आली असून यासाठी पुरग्रस्त भागातील लोकप्रतिनिधींना मात्र बोलवण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकार जोपर्यंत या बैठकीसाठी बोलवत नाही तोपर्यंत आम्ही चक्काजाम आंदोलन चालूच ठेवणार असा निर्धार आंदोलकांच्या वतीने यावेळी करण्यात आला.
-------------------------------