कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आठ व नऊ जुलै २०२५ रोजी शाळा बंद आंदोलनाच्या दोन दिवसाच्या कालावधीत जे शिक्षक अनुपस्थित आणि आंदोलनात सहभागी होते तसेच ज्या शाळा बंद होत्या तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतने विनावेतन करण्यात येणार आहे . त्या अनुषंगाने २१ जुलै पर्यंत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक , प्राचार्यांनी माहिती सादर करावी’ अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले होते या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील १३०० हून अधिक शाळांचा सहभाग होता. प्राथमिक, माध्यमिक ,अनुदानित, खाजगी अनुदानित अशा सर्वच शाळांचा सहभाग होता. दोन दिवस शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. दरम्यान कारवाईच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला मुख्याध्यापकांकडूून धिमा प्रतिसाद मिळत आहे.
आठ व नऊ जुलै २०२५ रोजी राज्यातील शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दरम्यान या आंदोलनात सहभागी शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्यासंबंधी माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्याकडून माहिती मागवली होती. आंदोलनात शाळा व शिक्षकांचा सहभाग होता की नाही यासंबंधीचा वस्तुस्थिती अहवाल २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करण्याविषयी पत्र पाठवून ही शाळा व मुख्याध्यापकांकडून शिक्षण विभागाच्या आदेशाला धिमा प्रतिसाद मिळत आहे.
------------------------