कोल्हापूर न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणे अभिमानाची व सन्मानाची बाब असून यामुळे पन्हाळगडाची ओळख जगभर पोहोचेल, असे प्रतिपादन करुन नव्या पिढीसाठी प्रेरणादायी इतिहास असणाऱ्या पन्हाळगडाचा विकास आराखडा राज्य आणि केंद्र सरकारला सादर करण्यात येईल. याबरोबरच जिल्ह्यातील किल्ल्यांचे जतन व संवर्धन करुन अधिक संरक्षित करण्यासाठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
जागतिक वारसास्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज पन्हाळा किल्ल्याला भेट देऊन किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर त्यांनी ताराराणींच्या राजवाड्याला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नंतर शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी पन्हाळा शाहुवाडी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, अधिकारी, कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पन्हाळा किल्ल्याचे नाव समाविष्ट झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद देवून त्यांनी पन्हाळगडावरील व जिल्ह्यातील नागरिकांचे अभिनंदन केले. पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत झाल्यामुळे पन्हाळगडावर व जिल्ह्यात जगभरातील पर्यटकांचा ओघ वाढेल. तसेच येथील पर्यटनाला चालना मिळेल. पन्हाळगडाचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा असल्यामुळे या किल्ल्याचा विकास आराखडा तयार करुन किल्ल्याचा चांगल्या पद्धतीने विकास घडवण्यात येईल.
छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीमध्ये पन्हाळगड अत्यंत महत्वाचा किल्ला आहे. अनेक ऐतिहासिक घडामोडी या किल्ल्यावर घडल्या असून हा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. पन्हाळ्यासह विशाळगडाच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यात येईल. तथापि किल्ल्यांचा विकास साधताना स्थानिकांची अडचण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
--------------------