मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते येत्या 15 जुलै रोजी जयंत पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा गत 10 जून रोजी वर्धापन दिन साजरा झाला होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. शरद पवारांनी मला अनेक वर्षे संधी दिली. तब्बल 7 वर्षांचा कालावधी दिला. पण आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. त्यामुळे मी सर्वांसमोर मला मदमुक्त करण्याची विनंती करत आहे. शेवटी हा पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतरच राजकीय वर्तुळात ते कोणत्याही वेळी प्रदेशाध्यक्ष पद सोडतील असे मानले जात होते. त्यानुसार आज त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
शशिकांत शिंदे हे एक माथाडी नेते आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई आहे. ते शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. युतीच्या जावळी येथून सदाशिव सपकाळ आमदार झाले. त्यानंतर 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा जावळीचा गड ताब्यात घेण्यासाठी शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना तिथे धाडले. त्यानंतर शिंदे यांनी जावळीचा गड यशस्वीपणे सर करून तिथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. तेव्हापासून ते जावळीच्या राजकारण रमले. त्यानंतर कोरेगावच्या आमदार शालिनीताई पाटील यांनी शरद पवारांविरोधात दंड थोपटले होते तेव्हा पवारांनी पुन्हा शिंदे यांना कोरेगावात पाठवून शालिनीताईंचा बंदोबस्त केला.
याच काळात कोरेगावच्या अन्य एका शिंदेंनी शशिकांत यांना कोरेगावच्या मैदानात अस्मान दाखवले. पण ही बाब दुर्लक्षित करून पवारांनी त्यांना ताकद देण्यासाठी विधान परिषदेवर संधी दिली. त्यामुळे त्यांचे व शरद पवारांचे संबंध अतिशय जवळचे असल्याचे मानले जाते.
----------------------