जलसिंचन योजनेचा जॅकवेल पंचगंगा नदीपात्रात कोसळला

Kolhapur news
By -

 

                  


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


      मौजे वडगाव (ता हातकणंगले) येथील पंचगंगा नदीकाठावरिल श्री गणेश सहकारी पाणी पुरवठा या संस्थेचा उपसा जलसिंचन जॅकवेल पंचगंगा नदीत कोसळला . जॅकवेल मध्ये असलेल्या विद्यूत मोटारी पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांच्या या जलसिंचन योजनेचे ३३ लाखाचे नुकसान झाले आहे . यामुळे मौजे वडगाव गावातील शेतीचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे .


       संततधार पावसामुळे व राधानगरी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने गेल्या चार दिवसात पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे . जॅकवेल भोवतीच्या नदीपात्रालगतचा मातीचा भराव खचल्याने जॅकवेल नदी पात्रात कोसळला. जॅकवेल नदीपात्रात पडल्याने शेतकऱ्यांच्या या सिंचन योजनेच्या जॅकवेल मध्ये असलेल्या १०० अश्वशक्तीच्या ३ विद्यूत मोटारी , ३ पंपसेट , टर्बाइन पंप , पाईप लाईन ,नदीपात्रात बुडून वाहून गेले आहेत .


      मौजे वडगांव गावातील श्रीकांत सावंत , नामदेव चौगुले , रावसाहेब चौगुले , मनोहर चौगले , यांच्या पाठपुराव्याने व मेजर कै . गणपतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हा भुविकास बँकेचे कर्ज घेऊन ४० वर्षापूर्वी श्री गणेश सहकारी पाणी पुरवठा उपसा जलसिंचन योजना सुरू केली होती. सध्या जॅकवेल व विद्यूत मोटारी पाण्यात पूर्णपणे बुडाल्याने व काही भाग वाहून गेल्याने शेतीला पर्यायी पाणी पुरवठा करणे अशक्य होणार आहे .


     --------------------------