मुंबई : चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान एक मोनो रेल आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास बंद पडली आणि एका बाजूला झुकली होती. सव्वातासाच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दोन-तीन ठिकाणच्या काचा फोडून या प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे मोनो रेल प्रशासनाकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, तीन स्नोर्केल वाहनांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले होते.
सव्वा तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाकडून मोनो रेलच्या काचा फोडून आणि दरवाजा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तीन शिड्यांच्या मदतीने या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.