अमेरिकेत सुद्धा भारतीयांनी साजरा केला 80 वा स्वातंत्र्य दिन. प्रा.चंद्रकांत जाधव यांनी देशवासियांसाठी कॅलिफोर्नियातून शेअर केले व्हिडीओ.

Kolhapur news
By -

 

   


                



                    कोल्हापूर न्यूज / वि रा भाेसले


 मुरगूड चे रहिवासी आणि कोजिमाशीचे माजी चेअरमन प्रा. चंद्रकांत जाधव यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात तेथील भारतीयांनी साजरा केलेल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे व्हिडीओ देशवासियांसाठी शेअर केले आहेत.


   हे व्हिडीओ पाहून कोणाही भारतीय नागरिकाची छाती अभिमानाने फुलून यावी. बाहू हवेत भिरकावले जावेत आणि ओठांनी आवेशाने घोषणा द्यावी.


          " भारत माता की जय ''


 प्रा.जाधव हे अमेरिकेतील आपल्या लेकी कडे गेले होते. 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन टी व्ही वर कोठे दिसतो का पाहूया म्हणून त्यांनी हॉल मधला टीव्ही लावला. हातातल्या रिमोट वर बोटे फिरत होती. इतक्यात खिडकीच्या तावदानातून त्यांना रस्त्यावर एक  भव्य दृश्य दिसले.


 सजवलेला रथ,त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा. मजबूत किल्ला, त्या समोर पगडी  धारी मावळे. उंच फडकणारा भगवा, रथाच्या मागील बाजूवर  झळकणारा तिरंगा.रथासमोर हातात तिरंगे घेऊन हलके पदन्यास करत नाचणाऱ्या तरुणी, समोर चक्क महाराष्ट्रीय लेझीम पथक होते.रथावर महात्मा फुले, सावित्री बाई फुले,स्वातंत्र्यवीर सावरकर,सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादी प्रसिद्ध कीर्तिवंत भारतीयांची चित्रे.


    प्राध्यापकांनी झटकन बाहेर धाव घेतली .स्वतःही एक तिरंगा हातात घेऊन नाचवला.

   ते अनपेक्षित दृश्य पाहून ते भारावून गेले.

       दोन  दिवसांनी रात्री दहा वाजता अचानक त्यांचा कॅलिफॉर्निया राज्यातील प्रिमाऊंट  गावातून व्हिडीओ कॉल आला. तेथे त्यावेळी सकाळचे पावणेदहा वाजले होते.


  " कोल्हापूर न्यूज नेटवर्क वरील बातम्या आम्हीं इथे व्हाट्सअप वर बघत असतो. मुरगूड च्या बातम्या येतात. समाचार समजतो. फार बरं वाटतं. आता इथल्या भारतीयांनी साजरा केलेला स्वातंत्र्य दिन पण दाखवा.. "


    प्राध्यापकांचे शब्द भारावले होते. वाणित आर्जंव होते.थोडा उशीर होतोय पण आपल्या देशातले लोक हे पाहुदेत.


     सातासमूद्रापार लेकीकडे रहायला गेलेल्या या महाराष्ट्रीय माणसाच्या राष्ट्रभक्तीचे कौतुक वाटले. सावरकरांच्या त्या ओळी आठवल्या.


 "ने ने मज परत मातृभूमीला 

 सागरा प्राण तळमळला."


  त्याच कॉल वर त्यांनी सांगितले की इथे फक्त महाराष्ट्रीयच नव्हे तर तामिळनाडू, केरला, युपी, कर्नाटक, एमपी राज्यातील भारतीय सुद्धा आपापल्या वसाहतीत मोठया प्रमाणात भारतीय स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताक दिन साजरा करतात. गणेशोत्सव, दिवाळी, पोंगळ, सारखे सण सुद्धा साजरे करतात.


    इतके राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान असतांनाही आपला देश सातशे वर्षे गुलामीत कसा गेला याची खंत मात्र मनाला चटका देऊन जाते.


    डॉ. आंबेडकरांनी मांडलेली स्वतंत्र भारताची घटना अमेरिकेच्या घटने पेक्षा सुद्धा सशक्त आहे. आता पुन्हा नाही कुणाचे गुलाम व्हायचे. असा आंतरिक भाव या व्हिडीओनी प्रत्येक भारतीयाच्या मनात जागवला गेला तर तेही नसे थोडके.


      जय भारत






               ----------------------------------