जालना : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती अनुदानात तब्बल 25 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात उघड झाला आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी असलेली मदतच बोगस लाभार्थ्यांच्या नावावर वळवून अधिकाऱ्यांनी अफरातफर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 22 तलाठ्यांसह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्याने शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
सन 2022 ते 2024 या काळात जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. शासनाने पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक आपत्ती अनुदान जाहीर केले. मात्र, या अनुदानाचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना न देता, संगणक प्रणालीचा गैरवापर करून बोगस नावे दाखल करणे, खोटी कागदपत्रे सादर करणे आणि बनावट एन्ट्रीज करणे अशा प्रकारे सुमारे 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांची बेकायदेशीर वळवणूक करण्यात आली.
----------------------