'अटलजी पंतप्रधान होईपर्यंत मी चप्पल घालणार नाही', ही प्रतिज्ञा शेवटच्या क्षणापर्यंत पाळणारे बाळासाहेब

Kolhapur news
By -

 

                     


           'अटलजी पंतप्रधान होईपर्यंत मी चप्पल घालणार नाही', ही प्रतिज्ञा ज्यांनी शेवटपर्यंत पाळली आणि हा संकल्प ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळला असे ध्येयवादी व्यक्तीमत्व  म्हणजे ल. वि. उर्फ बाळासाहेब गलगले.


सच्चा देशभक्त, करारी, निष्ठावान, निःस्वार्थी, स्वतःच्या मनाशी ठाम असणारी, लोकांच्या कामाबाबत तळमळ असणारी सांगली शहरातील आदर्श व्यक्ती म्हणजे बाळासाहेब गलगले . 


अत्यंत खडतर, संघर्षमय आणि आजच्या तरुण पिढीसमोर आदर्शवत ठरावे, असे बाळासाहेबांचे जीवनकार्य आहे. संघाचे, जनसंघाचे, भाजपाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. सांगली शहराचे सा. विवेकचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले आहे. सायकलवरून फिरून विवेकचे अंक त्यांनी घरोघरी पोहोचवले आहेत. इतकेच नव्हे तर ते उत्तम लेखनही करीत. सांगली नगरपालिकेचे नगरसेवक होते, काही काळ उपनगराध्यक्षपदही भूषवले. बाळासाहेब संसारापेक्षा राजकारणातच जास्त रमले.


संघावरील आणीबाणी असो, गोवा मुक्ती आंदोलन असो. या सर्वात त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. बैठक असो, सभा असो, बाळासाहेब सगळीकडे पुढे असायचे. खुर्च्या मांडणे, सतरंज्या घालणे, टेबल मांडून स्टेज तयार करणे ही कामे ते आवडीने करीत. अन्यायाविरुद्ध लढणे, सर्वसामान्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे हे त्यांचे आद्य कर्तव्य होते. विवेकानंद पतसंस्था, विवेकानंद विचारमंच या त्यांनी उभारलेल्या संस्था आजही सुरू आहेत. सामाजिक जाणीव असलेला एक सच्चा कार्यकर्ता कसा असावा, त्याचा आदर्श वस्तुपाठच बाळासाहेबांनी घालून दिला आहे.


       -------------------------