कोल्हापूर न्यूज / वि. रा .भोसले
देशाच्या राजधानीत म्हणजे दिल्लीमध्ये घडलेल्या एका निंदनीय घटनेची चर्चा सर्व वृत्तवाहिनांवर गेले दोन तीन दिवस सुरू आहे. ती घटना म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेला हल्ला होय. मुख्यमंत्र्यांवर हल्ला झाला यापेक्षा एका महिलेवर हल्ला झाला ही गोष्ट अत्यंत घृणास्पद आहे.प्रत्यक्ष झालेल्या हल्ल्याचे चित्रण दाखवले जात नाही म्हणजेच ते खरोखरच न पाहण्यासारखे असावे असे मानले जाते.
माध्यमानी घेतलेल्या नागरिकांच्या बाईट्स असे सांगतात की मुख्यमंत्री गुप्ता यांना हल्लेखोराने थप्पड मारली व केस ओढले.हे खरे असेल तर त्या नराधमाला तेथेच गोळी घालायला हवी होती.गुप्ता या कांहीं सामान्य नागरिक नव्हत्या. एका केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या. लोकशाही पद्धतीने जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधी होत्या.त्यामुळे त्यांच्या वर ची थप्पड म्हणजे लोकशाहीवरील थप्पड असे मानले जाते.दिल्ली मध्ये आणखी एक आंदोलन सुरू आहे.तेही भारतीय लोकशाहीच्या विरोधात आहे.बिहार मध्ये मतदार छाननी चालू आहे ती छाननी बोगस मतदार हटवण्यासाठी सुरू आहे.जे देशाचे खरे नागरिक आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार असतो.खुर्चीच्या राक्षसी लालसेने अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मतदानाचे अधिकार दिले गेलेले आहेत असे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्याने छाननी सुरू झाली आणि काय आश्चर्य असे 50 लाखापर्यंत बोगस मतदार मिळाले.
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.यात दोन गोष्टींचा उल्लेख महत्वाचा ठरेल.तेजस्वी यादव यांची दुहेरी ओळख पत्रे होती.ते मात्र साळसूद पणे सांगत होते की माझेच नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. वा रे वा ! राहुल गांधी जे आरोप आयोगावर करत होते त्या बद्दल शपथ पत्र (Affidavit) द्या असे आयोगाने सांगितले.ते द्यायला तयार नाहीत.म्हणजे नुसतेच निराधार ओरडायचे.ही दोन्ही उदाहरणे म्हणजे लोकशाहीला थप्पड मारल्यासारखे आहे.
आणखी एक उदाहरण घेऊ.
नुकतेच लोकसभेत ऑनलाईन गेमिंग ला बंदी घालणारा कायदा पास झाला.प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि अभिनेते व अभिनेत्री या गेमिंगची जाहिरात करत होते व कोटी रुपये मिळवत होते. यात शेवटी एक वाक्य असायचे .
"जबाबदारीने खेळा."
म्हणजे हा जुगार होता.
गुटखा,सिगारेट मद्यपान हे आरोग्याला घातक आहे असे प्रत्येक उत्पादनावर लिहिलेले असते.तरीही त्यांची जाहीर जाहिरात सेलिब्रिटी करत असतात.ही सुद्धा कायद्याला मारलेली थप्पड आहे.
सत्ताधारी सरकारला विरोधक असलेच पाहिजेत .त्याशिवाय स्वच्छ व पारदर्शक कारभार होऊ शकत नाही.तथापि केवळ आपल्याला सत्ता मिळाली नाही म्हणून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला कसे पाडता येईल याचाच विचार करून बिन बुडाचे खालच्या पातळीचे राजकारण करणे म्हणजे सुद्धा लोकशाहीला थप्पड आहे.
---------------------------------------