राष्ट्रीय स्वयंसेवक पंतप्रधान मोदींचा राजीनामा घेणार : देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार

Kolhapur news
By -

                    


      पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिलेत. देवेंद्र फडणवीस यांना रेशीमबागेतून तसे संकेत मिळालेत. त्यानुसार, त्यांनी पंतप्रधानपदाची तयारी सुरू केली आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.


हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यात त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील दावा केला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यामुळे रेशीम बागेचे वारे हे त्यांच्या कानावर लवकर येते. तेथून त्यांना संकेत मिळाले आहेत की, 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेतला जाणार आहे. त्याबाबतच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोदी जाणार आणि नवे पंतप्रधान येणार अशी पक्की माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्ने पडत आहेत.


ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींकडे दोन राष्ट्रीय शेठ आहेत. त्या शेठ लोकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात गडगंज केले आहे हे सर्वश्रुत आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मोहीत कंबोज नामक व्यक्तीला गडगंज करत आहेत. जेणेकरून पंतप्रधान पदासाठी जेवढा मसाला लागेल, तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांनी त्याच्यावर सोपवली आहे. त्यानुसार, दिल्लीश्वराच्या आदेशाने मुंबई अदानींच्या घशात टाकल्यानंतर उर्वरित मुंबई कंबोज यांना देण्याची प्रक्रिया फडणवीसांनी सुरू केली आहे. त्यांना एवढी संसाधने दिल्लीत गेल्यानंतर वापरता येतील. त्यासाठी त्यांनी ही तजवीत सुरू केली आहे, असे सपकाळ म्हणाले.


        ---------------------