क्रिकेट वीरांनो एशिया कप जिंका आणि ऑपरेशन सिंदूर ला अर्पण करा.

Kolhapur news
By -

 

         


                कोल्हापूर न्यूज  /  वि.रा.भोसले


        एशिया कपचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हेच संघ आमने-सामने येणार आहेत . नको नको म्हणत भारतीय क्रिकेट वीरांना दोन वेळा पाकिस्तानच्या विरुद्ध खेळावे लागले.दोन्ही सामने त्यांनी जिंकले.आपल्या देशाने हे दोन्ही विजय अत्यंत जल्लोषात साजरे केले.त्याचे कारण म्हणजे  पहेलगामच्या नरसंहाराचा तो बदला आहे असेच देशवासीयांना वाटले असावे.पाकिस्तान्यांना मात्र त्याचा जरासुद्धा खेद वाटत नाही.कसा वाटणार ? पाकिस्तानने चार वेळा युद्धात भारताकडून हार खाल्ली आहे.बांगला देशाच्या निर्मितीचे आणि ९३ हजार सैनिकांच्या शरणागतीचे शल्य अजूनही त्यांना टोचत आहे.कारगिल  आणि उरी युद्धात तर त्यांची आणखी नाचक्की झाली.३७० कलम हटवल्यानंतरही काश्मीर गेले गेले म्हणून उगीचच ऊर  बडवून घेतला.


ऑपरेशन सिंदूर मध्ये गुडघ्यांना माती लागूनही तेथील लष्कर प्रमुख असीम मुनीरने स्वतःला फील्ड मार्शल म्हणून मिरविले नाक कापले तरी भोके शिल्लक आहेत म्हणून निर्लज्जपणे सांगत सुटलेल्या पाकिस्तानची जगातल्या अनेक देशांनी नालस्ती केली .युद्ध जिंकता येत नाही म्हणून अतिरेक्यांना पुढे करून , त्यांना प्रशिक्षण देऊन निरपराध आणि निशस्त्र नागरिकांचा बळी घेण्याचे निर्घृण कृत्य पाकिस्तानने केले आहे. हे एकच नव्हे ९३ चे मुंबईतील बॉम्बस्फोट आणि २६/११ चा हल्ला त्याचीच उदाहरणे आहेत. हीच मस्ती पाकिस्तानी क्रिकेट टीम मध्ये सुध्दा पहायला मिळाली .भारतीय क्रिकेट खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन  करायला नकार दिला.त्यांना आपल्या २६ निरपराध देशबांधवांच्या मृत्यूचे दुःख जाणवत होते .


   त्यांनी आपला विजय सुध्दा साधेपणाने आणि विनयाने स्वीकारला.पाकिस्तानी खेळाडूंना ही जाणीव असायला हवी होती. उलट त्यांनी पारंपरिक मस्तवालपणा दाखवला. बॅट ने बंदुकीचा आणि  हाताने विमान हल्ल्याचा इशारा करून त्यांनी सिंदूरची चेष्टा केली.एवढंच नव्हे त्या २६ जीवांचे मरण सुद्धा त्यांनी अगदी हलक्यात घेतले.बदल्यात भारतीय सेनेने फक्त अतिरेक्यांची ठिकाणे उध्वस्त केली.नागरी वस्तीवर कोठेही हल्ले केले नाहीत.युद्धातला नियम काय फक्त आम्हीच पाळायचा ?


   पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंनी तोच कित्ता गिरवला आहे.  १०० गुन्हे माफ केल्यानंतर श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने शिसुपालाचे शीर उडवले होते.मस्तीचा शेवट असाच व्हायला हवा. क्रिकेट वीरांनो संयम  सोडू नका .वृथा अहंकार बाळगू नका. आत्मविश्वास ढळू देऊ नका . आता सुदर्शन तुमच्या हाती आहे.एशिया कप जिंकून तो  ऑपरेशन सिंदूरला अर्पण करा  ही केवळ क्रिकेट रसिकांची नव्हे तर सर्व भारतवासीयांची अपेक्षा आहे.


             -------------------------