कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जिद्द चिकाटी व कष्टाच्या जोरावर घरची परिस्थिती बेताची असतानाही नानीबाई चिखलीतील निहाल बशीर नदाफ यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी पदापर्यंत मिळवलेले अतुलनीय इतरांच्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे . वडीलांनी सेवा सोसायटीकडे तुटपुंजा पगारावर काम करून जिद्दीने मुलाला बी इ कॉम्प्युटर पर्यंतचे शिक्षण दिले , त्यानंतर निहालने मुंबई येथे आयटी कंपनीमध्ये नोकरी करत परीक्षा देऊन त्यांनी हे नेत्रदीपक यश मिळवले आहे. राष्ट्रीयकृत बँकेत थेट शाखाधिकारी पद मिळवले.या पदावर नियुक्ती मिळवणारे नानीबाई चिखलीतील निहाल नदाफ हे पहिलेच शाखाधिकारी आहेत.
निहालचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिखली गावांमध्येच झाले . दहावीनंतर त्यांनी कागल येथे डी आर माने कॉलेजला कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर कोल्हापूर येथे बी ई कॉम्पुटर ची डिग्री पूर्ण केली . त्यानंतर हैद्राबाद येथे कंपनीमध्ये नोकरीसाठी असणारे तीन महिन्याचे ट्रेनिंग पूर्ण केले , त्यानंतर मुंबई येथे आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळाली .
मुंबईमध्ये नोकरी करतच बँकेमध्ये शासकीय नोकरीसाठी परीक्षा व मुलाखत दिली .त्यामध्ये यश येऊन त्यांची देशातील अग्रगण्य बँक असणाऱ्या बँक ऑफ इंडिया मध्ये सीनियर मॅनेजर पदी निवड झाली आहे. निहालच्या या यशाने आई-वडिलांचे व नदाफ कुटुंबीयांचे स्वप्न साकार झाले आहे. निहालच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
--------------------------

