कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी अनेक मंडळानी मिरवणुकीची जय्यत तयारी केली होती.देखावे पाहण्याकरिता सुद्धा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.अमरनाथ यात्रा,भूतांचा नाच,संत बाळूमामा असे एकापेक्षा एक सरस देखावे पाहून भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. महाप्रसादाने पोटोबाही शांत झाले होते. बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली तेंव्हा सगळे भाऊक झाले.
प्रथा आणि परंपरा यांना साक्षी ठेऊन नागरिकांनी बाप्पांना वाद्यांच्या गुजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निरोप दिला. मिरवणुका सुद्धा तेवढ्याच दमदार होत्या.कांहीं मंडळानी चक्क वारकरी दिंडीच सादर केली होती. आषाढी एकादशीला पांडुरंगाला पायी जाणाऱ्या भक्तांचा मेळा पहायला मिळाला. दांडपट्टा, लेझीम, बेंजो आणि पारंपरिक वाद्यांची रेलचेल होती.लेसर व डॉल्बीवर पोलिसांची नजर होती.साउंड लेव्हल तपासण्याचे कामही सुरू होते.मिरवणुकीतील बाप्पांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रेक्षकांना, लहान मुलांना,दवाखान्यातील रुग्णांना मिरवणुकीतील घातक वाद्यांचा त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना पोलिस प्रशासनाने आधीच दिलेल्या होत्या.
सरपिराजीराव तलावाचे पाणी मुरगूड मध्ये पिण्यासाठी वापरले जाते .म्हणून तलावात विसर्जन करू नये अशा सूचना नगरपरिषदेने दिलेल्या होत्या.वेदगंगा नदीच्या दत्त घाटावर व कुरणी धरणाजवळील घाटावर जास्तीतजास्त विसर्जन करण्यात आले.कोठेही दंगा नाही,गोंधळ नाही.सर्वत्र भक्तीचाच पूर आलेला होता.निर्माल्य गोळा करण्यासाठी नगरपरिषदेने ट्रॉली ट्रक ची व्यवस्था सुद्धा केली होती.
मुरगूड शहरात २५ पर्यंत मोठी गणेश मंडळे आहेत .मिरवणुकीसाठी ,ट्रक ,ट्रॅक्टर इत्यादी वाहनांचा वापर करण्यात आला होता.फटाक्यांची आतषबाजी ,गुलालाची उधळण ,बाप्पांच्या घोषणा यामुळे मिरवणुकात जल्लोष निर्माण झाला.पाेलिस बंदोबस्त चोख होता.
गणपती बाप्पा मोरया.
पुढच्या वर्षी लवकर या.
अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
---------------------------


