मुरगूड ला मिळणार लोक नियुक्त नगराध्यक्षा. शहर सक्षम उमेदवाराच्या प्रतिक्षेत.

Kolhapur news
By -

            


              
             कोल्हापूर न्यूज / वि.रा. भोसले


       नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले.मुरगूडला महिला नगराध्यक्षा मिळणार आहे.मोदी सरकारने  सप्टेंबर २०२३ मध्ये नारीशक्ती वंदन अधिनियम पारित केला  व लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा मध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण (अधिनियम १०६ नुसार ) मंजूर केले आहे.त्याची तंतोतंत अंमलबजावणी अजून झालेली नाही.त्यासाठी जनगणना आणि   निर्वाचन क्षेत्रे यांची निश्चिती करावी लागणार आहे असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे. म्हणजे भविष्यात हे ३३टक्के महिलांना द्यावे लागणारच आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सुद्धा महिलांचे आरक्षण हळू हळू येत चालले आहे.आरक्षण सोडतीनुसार मुरगूडला खुल्या प्रवर्गातील   महिला नगराध्यक्षा  मिळणार आहे.त्यासाठी सक्षम महिलेचा शोध प्रत्येक गटाकडून सुरू झाला आहे.


    केंद्र सरकारच्या प्रायोजित कार्यक्रमानुसार हे नारीशक्ती वंदन आहे हे प्रत्येकाने विचारात घ्यायला हवे.अनेक ग्रामपंचायतीत महिला सरपंच किंवा उपसरपंच असतात .प्रत्यक्षात ती महिला चुलीजवळच असते.नवरा किंवा मुलगा कॉलर ताठ करून पंचायतीचा कारभार पहात असतो.हा कसला नारी सन्मान !हा तर त्या पदाचा अवमानच असतो.शहरातील नगराधक्ष पद हे मोठे सन्मानाचे असते. राष्ट्रीय दिनी ध्वजारोहणाचा त्यांना मान असतो. सरकारी निधीचा विनियोग करण्याचे काम ही त्यांच्याकडे असते.शहराच्या सर्व प्रभागांची जबाबदारी लोकनियुक्त नगराध्यक्षावर असते. तेथे उगीच नावाला महिला उमेदवार देऊन चालणार नाही.


  कोल्हापूर,मुंबई,पुणे यासारख्या मोठ्या शहरांचे हे पद महिलांनी भूषविले आहे. तिथल्या पदाला महापौर असे नाव असते एवढेच.मुरगूड ला नगरपरिषद आहे.हे एक विकसनशील शहर आहे.शेती मध्ये अग्रेसर असले तरी औद्योगिक दृष्ट्या थोडे मागे आहे. आय टी पार्क,एम आय डी सी ,स्टार्ट अप योजना केंद्र असे कांहीतरी संजीवन युवा वर्गाला मिळायला हवे.देवळांना व बुद्ध स्थानांना निधि देऊन  मतपेटीचा तबला वाजवत बसण्याचे दिवस आता मागे पडलेत. युवक युवतींच्या हाताला काम  पाहिजे.उच्च व्यावसायिक शिक्षणाची कमतरता आहे.ती भरून काढली पाहिजे.या भागातून जवळ जवळ दीडशे तरुण तरुणी नोकरीसाठी बाहेरगावी जातात.पहाटे पासून स्कूटर , मोटार सायकली  धावत असतात.ही सगळी आव्हाने झेलणारे नेतृत्व हवे.त्यासाठी उच्चशिक्षित,साहसी,आणि सक्षम महिला  उमेदवाराची  प्रतिक्षा आहे.


   या पदाचा बाहुल्या सारखा उपयोग केला तर तो स्त्री शक्तीचा सन्मान नव्हे तर अवमान ठरेल. मुरगूड शहर आता अशा महिला उमेदवाराच्या प्रतिक्षेत आहे.


              ------------------