कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विविध सणांचे औचित्य साधून कळंबा मध्यवर्ती कारागृहात निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन कळंबा येथे करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना कारागृहात निर्मित उच्च दर्जाच्या विविध वस्तू माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुंदर कलाकृतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. कारागृहाबाहेरील कळंबा चौकात उभारण्यात आलेल्या स्वतंत्र इमारतीत सुरू करण्यात आलेल्या कारागृह निर्मित वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री दालनाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.
सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तू, आकाशकंदील, कपडे, रुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, कोल्हापूर नगरीचे आराध्यदैवत अंबाबाईचा प्रसादाचा लाडू तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक एन.जी. सावंत तसेच इतर सर्व कारागृह अधिकारी, कर्मचारी व लिपिक-तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
--------------------

