कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी व आनंददायी वातावरण मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा 3 हे अभियान 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अभियानाची व्याप्ती -
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे.
अभियानाची उदिष्टे :-
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे. शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.
अभियानाचा कालावधी:-
24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असून सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. 3 नोव्हेंबर रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होवून अभियानाचा कालावधी 31 डिसेंबर रोजी पूर्ण होईल. 1 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया होईल.
अभियानाचे स्वरुपः-
पायाभूत सुविधा - 38 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - 101 गुण, शैक्षणिक संपादणूक - 61 गुण असे 200 गुणापैकी गुणांकन करण्यात येईल. सहभागी शाळांचे केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर विविध समित्यांमार्फत मुल्यांकन केले जाईल. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.
-----------

