मुंबई : राज्यातील ज्या शेतजमिनीवर एकापेक्षा जास्त खातेदार (सहिस्सेदार) आहेत, अशा सामाईक खात्यांमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर त्याच्या हिश्याची जमीन स्वतंत्रपणे नमूद करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ नुसार विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावरील प्रत्येक खातेदार अथवा शेतकऱ्यांच्या नावासमोर क्षेत्र नमूद केले जाणार आहे.राज्यात तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार होण्यासाठी जमिनीचे अचुक क्षेत्र नोंद असणे आवश्यक आहे.
तथापी सातबारा उताऱ्यावर सामाईक खात्यामध्ये एकूण क्षेत्र हे एका खातेदाराच्या नावासमोर नमूद केले जाते. परंतु, शेतकरी फार्मर आयडी निर्माण करताना सर्व खातेदारांच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते. यामुळे फार्मर आयडी तयार करताना तांत्रिक अडचणी येत आहेत.
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि पीक पाहणी, जमीन खरेदी-विक्री किंवा फेरफार नोंद करताना होणारा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक हिस्सेदाराचे क्षेत्र त्याच्या नावापुढे असणे आवश्यक आहे, यापार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभाग घेतला असून त्याचा शासन निर्णय सहसचिव संजय बनकर यांनी जारी केला आहे.
मोहिमेचे स्वरूप आणि कार्यपद्धती..
– खाते विभाजनासाठी तालुका, मंडळ स्तरावर शिबिर
– हिस्सेदारांना विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार
– खाते विभाजनाची प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना
– मोहिमेत अधिकाधिक शेतकऱ्यांच्या सहभागाचे उद्दिष्ट
शेतकऱ्यांना काय होणार फायदा..
– प्रत्येक शेतकऱ्याला हिश्यानुसार स्वतंत्र ओळख क्रमांक
– कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ थेट मिळणार
– खरेदी-विक्री करताना तांत्रिक अडचणी दूर होतील
– ई-पीक पाहणीत स्वतःच्या हिश्शाच्या जमिनीची अचूक नोंद
------------------------------------

