कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राजकारण ही एक पवित्र योजना आहे. राजकारणाच्या माध्यमातून कल्याणकारी राज्य करण्याची संधी मिळते. प्राचीन काळी, इतिहासात अशी कितीतरी राजे, लोकनेते होऊन गेले. ज्यांनी कल्याणकारी राज्यकारभार केला. कलियुगातही असे लोकनेते होते त्यांचेही कार्य प्रेरणादायी ठरते. अशा या राजकारणाचा सखोल अभ्यास करून लिखाणातून आणि व्याख्यानातून ऊहापोह अगदी सहज सोप्या भाषेत विद्यार्थ्यांसह समाजाला समजावून सांगणारे वृत्तस्थ राजकीय संशोधक डॉक्टर अशोक चौसाळकरसर होय. आज - 15 मार्च सरांचा ७६ वा वाढदिवस. सर आम्हाला शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र विषय शिकवित होते. सरांचा तास आम्हा विद्यार्थ्यांच्यासाठी परवणीच असायचा. चौसाळकरसर जसे राजकीय संशोधक आहेत तसेच ते विद्यार्थी प्रिय आणि समाजप्रिय शिक्षकही आहेत. सरांनी आम्हाला ज्ञानदान केलेच शिवाय पत्रकारितेतील साधन सूचितेचे संस्कारही केले. याबद्दल त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृतज्ञतेचे दोन शब्द....!
चौसाळकरसरांचे गाव आंबेजोगाई. (जिल्हा बीड) आंबेजोगाई हे ऐतिहासिक शहरच. या गावातच मराठीतील पहिले कवी मुकुंदराज रहात होते. सरांचे वडील शेतकरी. ते शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. सरांना १२ भावंडे. सर पाच भावात सर्वांना लहान. वडिलांनी आपल्या सर्व मुलांना शिक्षणात कमतरता भासू दिली नाही. यामुळे सरांसह सरांची भावंडं सुशिक्षित आणि सुस्थिर आहेत.
शैक्षणिकदृष्ट्या आंबेजोगाई प्रगत. या गावात पूर्वीपासून ग्रंथालय होते. वडील व मोठ्या भावंडांना वाचनाची आवड. स्वाभाविकच सरांनाही लहान पणापासूनच वाचनाची गोडी लागली. आंबेजोगाईत पुर्वीपासूनच ग्रंथालय होते. या ग्रंथालयाचा पुरेपूर लाभ सरांनी घेतला.
सरांचे महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून गावातीलच योगेश्वरी महाविद्यालयात झाले. या महाविद्यालयातही समृद्ध ग्रंथालय आहे. काॅलेजमधील फावल्या वेळेत सर ग्रंथालय, अभ्यासिकेत रमायचे. अगदी भान हरपून सर वाचत रहायचे. या दरम्यान सरांचे राजकारणासह अन्य विषयांचे वाचन खूप झाले. सर लहानपणापासूनच पुस्तकप्रेमी असल्याने या काॅलेजच्या ग्रंथालयाशी त्यांची घट्ट मैत्री जमली. अशा पद्धतीने सरांचा शैक्षणिक आणि अध्यापनाचा पाया गावातच मजबूत झाला.
सरांचे मोठे भाऊ मुंबई येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सरांची मुंबईत राहण्याची सोय झाली. सरांचे पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. राज्यशास्त्र विषय घेऊन सरांनी एम. ए. केले. 'न्याय आणि धर्म' या विषयात सरांनी पीएच. डी. केली. सरांच्या गाईड होत्या डॉक्टर उषा मेहता. उषा मेहता या गांधीवादी नेत्या, विचारवंत. त्यांनी स्वतंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांनी काही काळ स्वतंत्र्य चळवळीत रेडिओही चालविला. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. इतक्या महननीय गाईड सरांना लाभल्या. त्यांच्या कार्याचा सरांच्यावरही प्रभाव आहे. सरही जगताहेत गांधीवादी विचारानेच.
सरांचे अन्य तीन विषयात संशोधन
चौसाळकर सरांनी पीएच. डी. नंतर तीन विषयात सखोल संशोधन केले.
१) राजकीय प्रतिकार कसा व का करतात, त्याच्या काय प्रतिक्रिया असतात.
२) प्राचीन भारतीय राजकीय विचार - भारतातील लोकशाही संस्था.
३) आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत - रानडे, गोखले, नेहरू, टिळक, गांधी, आंबेडकर.
------------------------------
सर शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात अधिव्याख्याता म्हणून ११ एप्रिल, १९७९ रोजी रुजू झाले. सरांचे अभ्यासक्रमातील ग्रंथा बरोबरच दोन मराठी व दोन इंग्रजी वृत्तपत्रांचे बारकाईने वाचन असायचे. हे वाचन, राजकारण विषयी संशोधन आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याची आस, यामुळे सरांना अभ्यासक्रमातील शिक्षण आणि प्रत्यक्ष राजकारण याची अचूक सांगड घालून प्रभावीपणे शिकवणे अंगवळणीच पडले.
सरांनी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, विद्वत्ता परिषद, अधिसभेवर काम केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यास मंडळात राज्यशास्त्र व प्रशासन या विषयाचे सर तीन वर्षे प्रमुख होते. सर महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासदही होते. सरांनी राजकीय तत्त्वज्ञान, राजकीय सिद्धांत, मार्क्सवाद, धर्म, चरित्रात्मक अशी ४० पुस्तके लिहिली आहेत. सरांचे राजकारणातील संशोधन, त्यांचा प्रगाढ अभ्यास यामुळे कोल्हापुरातील अनेक समाजवादी संस्थां व अन्य संस्थांशी सर बांधले गेले. सरांनी असंख्य कार्यशाळेत, शिबिरात व अन्य ठिकाणी राजकारण, लोकप्रशासन या विषयावर हजारो व्याख्याने सेवाभावीपणे दिली. सरांनी याचा मानह कुठेही मिरवला नाही.
सरांचे राजकीय संशोधन आणि लोकप्रबोधन यामुळे देशातील थोर विचारवंत सरांचे मित्र झाले. याचा लाभ आम्हा विद्यार्थ्यांनाही झाला. असे थोर विचारवंत, समाजवादी, जेष्ठ पत्रकार कोल्हापुरात अथवा शिवाजी विद्यापीठात आले की त्यांचे व्याख्यान आमच्या वर्गात ठरलेले असायचे. अरूण साधू, भास्कर भोळे, प्र. ना. परांजपे, जी. पी. प्रधान, अनंतराव पाटील, सदानंद मोरे, समर नखाते, गंगाधर पानतावणे, अनंत दीक्षित, दत्ता सराफ, त्यागराज पेंढारकर यांना प्रत्यक्ष जवळून पाहताही आले आणि त्यांच्याशी अवांतर बोलताही आले. आम्ही अशी गेस्ट लेक्चर तल्लीन होऊन ऐकायचो. आमचा इतका उत्साह पाहून ते खूष व्हायचे. कधी कधी ते सर्वांनाच चहा पिण्यासाठी सोबत घेऊन जायचे.
आम्ही १९९६ ते १९९८ या दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या संवाद शास्त्र विभागात बीजेसी आणि एमजीसीच्या वर्गात शिकत होतो. त्यावेळी चौसाळकर सर राज्यशास्त्र विभागात प्रमुख होते. वृत्तपत्र विद्या विभागाची अतिरिक्त जबाबदारी सरांच्याकडे होती. सर दोन्हीही विभाग कार्यक्षमपणे सांभाळत होते. सर दोन्ही विभागाचे प्रमुख होते तरीही वेळापत्रकानुसार प्रत्येक तास घ्यायचे. शिवाय कार्यालयीन कामकाज पाहायचे. सर विद्यार्थ्यांना वेळ द्यायचे. संशोधन, सेमिनारसाठी मार्गदर्शन करायचे. अभ्यास सहलींचे नियोजन करायचे.
सरांचा तास आमच्यासाठी उत्सुकतेचा असायचा. सर शिकविता शिकविता उदाहरणे देत चालू घडामोडींची माहिती सांगायचे. सर नेहमीच कुर्ता पायजमा घालायचे. सर अत्यंत शांतपणे लेक्चर द्यायचे. त्यामुळे समजणं सोपे जायचे. वर्गातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीत सोप्या पण पक्व भाषेत शिकवायचे. यामुळे आम्हालाही इंग्रजी समजायचे. सर आदल्या दिवशी जिथपर्यंत शिकविले बरोबर त्याच्या पुढील भाग पुढील तासात शिकवायचे. प्रत्येक वर्गाच्या बाबतीत सरांना हे कसे जमते हे कोडे आजतागायत मला उलगडलेले नाही. सर शिकविताना आधीच्या तासाला काय शिकवले याचा सारांश सांगायचे मगच पुढील भाग शिकवायला सुरुवात करायचे. यामुळे आमचीही उजळणी व्हायची.
लोकसभेचा अंदाज अचूक
१९९८ ची लोकसभेची निवडणूक होती. कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे विक्रमसिंह घाटगे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे सदाशिवराव मंडलिक निवडणूक लढवीत होते. या निवडणुकीत वातावरण मंडलिकांच्या विरोधात दिसत होते. मात्र आम्ही केलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ संघाच्या सर्वेक्षणानुसार मंडलिकच विजयी होणार असा निष्कर्ष निघाला. मी व कुमार कांबळेने एमजीसी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून चौसाळकरसरांचे मार्गदर्शन घेऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अनेक खेड्यात सायकल वरून फिरून सर्वेक्षण केले. आमच्या सर्वेक्षणात मंडलिकच वरचढ दिसत होते. मात्र कागलमध्ये घाटगे यांना आघाडी मिळेल असा निष्कर्ष काढला. आम्ही अनेकवेळा सर्वेक्षण पडताळून पाहिले. तरीही आम्हाला मंडलिकच वरचढ दिसत होते. मंडलिकच विजयी होणार असाच निष्कर्ष निघत होता. तशी चर्चा वर्गातील राजकारणाचा अभ्यास असणाऱ्या मित्रांशी केली. त्यांनी आम्हाला खुळ्यातच काढले. चौसाळकरसरांना मात्र आमचे सर्वेक्षण अगदी बरोबर वाटले. त्यांनी आमचा निष्कर्ष दैनिक लोकमतमध्ये छापून आणला. लोकमतचे तत्कालीन संपादकांचेही मंडलिक निवडून येणार नाहीत असेच मत होते. पण आम्ही केलेले सर्वेक्षण खरे ठरले. आम्ही सर्वेक्षणात चाळीस हजार मताधिक्याने सदाशिवराव मंडलिक खासदार होणार असा निष्कर्ष काढला होता आणि नेमके तसेच झाले.
सरांनी आज - १५ मार्चला ७७ व्या वर्षात पदार्पण केले. सरांची प्रकृती ठणठणीत आहे. सरांना विद्यार्थी भेटले की आनंद होतो. मग सर आणि विद्यार्थी चर्चा करत करत लेक्चर रूममध्ये जातात. त्यावेळच्या विषयांची उजळणी सुरू करतात. माझ्या सारख्या विद्यार्थ्याला अधिकाधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता लागते. सर सध्याही तितकेच शांत, संयमी जीवन जगताहेत. निरोगी आणि दिर्घायुष्य लाभो, याच सरांना शुभेच्छा !
सर्व विद्यार्थी
बी. जे. सी. १९९७ बॅच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
लेखन : भारतभूषण केशव गिरी.
डॉ. अशोक चौसाळकर, शिवाजी उद्यानाजवळ, मातोश्री वृद्धाश्रम रस्ता, आर. के. नगर, कोल्हापूर.
----------------------------------------------------------

